
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने (केआयटी) अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील ३९ वर्षांच्या गुणवत्तापूर्ण आणि यशस्वी सेवेनंतर, अनेक वर्षांच्या पालकांच्या विनंती व मागणीवरून ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘केआयटी अकॅडमी’ यावर्षीपासून सुरु करत असल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले व केआयटी कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी यांनी दिली. ‘केआयटी अकॅडमी’ विद्यार्थ्यांना जेईई, नीट व सीईटी सारख्या राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धा व प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करेल.१९८१ मध्ये कोल्हापूर येथील औद्योगिक, व्यावसायिक आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ, तज्ज्ञ आणि नामवंत अशा दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन केआयटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. १९८३ मध्ये, केआयटी संस्थेने औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तांत्रिकसन्मुख बनविणे आणि त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बाजू देणे हा निदिध्यास बाळगून केआयटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले, जे महाराष्ट्रातील स्वयं-अनुदानीत अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी पहिले होते. गेली ३९ वर्षे अभियांत्रिकीचे दर्जेदार शिक्षण देणारी आणि विद्यार्थी व पालक यांची पहिली पसंती म्हणून केआयटी ही शिक्षण संस्था नावारूप आलेली आहे. केआयटीचा दुसरा उपक्रम म्हणजे १९९४ साली स्थापन केलेली केआयटीज इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट, येथे १२० इनटेकसह एमबीए (M.B.A.) अभ्यासक्रम तसेच ६० इनटेकसह एमसीए (M.C.A.) अभ्यासक्रम उपलब्ध आहे .
अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांच्या यशानंतर, यावर्षी अकरावी आणि बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी केआयटी अकॅडमी सुरू करत आहे. ही अकॅडमी विद्यार्थ्यांना JEE, NEET, MHT-CET यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी अचूक आणि प्रभावी मार्गदर्शन करेल. नामांकित व्यावसायिक संस्थांमध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांभोवती त्यांचा शिक्षणाचा पाय भक्कम करणाऱ्या आणि स्पर्धात्मक युगात अचूक मार्गदर्शन करणाऱ्या व्यासपीठाची कमतरता लक्षात घेऊन, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल व्यावसायिक करिअरसाठी त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी केआयटीने आणखी एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे, ते म्हणजे केआयटी अकॅडमी.केआयटीने आपल्या सर्व उपक्रमांमध्ये उत्कृष्टता प्रदान करण्यावर जोर दिला आहे. या अकॅडेमीमध्ये शिकवण्यासाठी देशभरातील नामांकित संस्थेत शिक्षण घेतलेले केरळ, प. बंगाल, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार गोवा या राज्यातील तज्ज्ञ प्राध्यापक नेमले आहेत.केआयटी अकॅडमी ही केआयटीच्या ३९ वर्षांच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे कारण ही अकॅडमी विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ प्रदान करेल. अनुभवी प्राध्यापक आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम करतील. आधुनिक अध्यापनशास्त्र आणि तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, आणि देशातील प्रीमियर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि पॅरा-मेडिकल संस्थांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हा उद्देश बाळगून या अकॅडमीची सुरुवात केआयटी करत आहे. यासाठी आयसीटी बेस्ड टेकनॉलॉजीचा वापर, ऑडिओ-व्हिडिओ प्रणालीने सुसज्ज असे वर्ग, संकल्पना बळकट करण्यासाठी विषय तज्ञांकडून नियमित शंका निवारण सत्रे, द्विसाप्ताहिक किंवा मासिक ऑल इंडिया स्तरावरील चाचण्या ज्यातून विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव होईल आणि प्रतिथयश शिक्षण संस्थांमध्ये त्यांचे स्थान प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल, नियमित अंतराने प्राध्यापकांविषयी विद्यार्थ्यांचा अभिप्राय, विद्यार्थ्यांच्या योग्य अनुकूलतेसाठी ऑनलाइन चाचण्यांसाठी सिम्युलेशन लॅब, हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, MOODLE प्लॅटफॉर्म, सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विषयांचे सखोल ज्ञान असलेले अत्यंत योग्य आणि अनुभवी शिक्षक, सुसज्ज आणि स्वतंत्र ग्रंथालय, तसेच सुलभ वाहतूकीसाठी बसेसची सुविधा यांद्वारे केआयटी अकॅडमी आपला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा निश्चितपणे अनुसरण करेल आणि विद्यार्थी आणि पालकांची प्रथम पसंती बनेल. यावेळी पत्रकार परिषदेस केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले व केआयटी कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी, केआयटी अकॅडमीचे समन्वयक एस. सेनगुप्ता, डॉ. गणेश एस. कांबळे, केआयटी प्रसारमाध्यम व प्रसिद्धी समन्वयक प्रमोद पाटील व अकॅडमीचे प्राध्यापक उपस्थित होते.
Leave a Reply