
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण पीक कर्जाच्या तब्बल ८५ टक्केपेक्षा जास्त पीककर्ज ही एकटी केडीसीसी बँक देते. दरवर्षी ३२ कोटी रुपयांचा तोटा सहन करून बँक पीककर्ज पुरवठा करते. यापूर्वी बँकेने १८०० कोटी रुपये कर्ज दिलेले आहे.महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये कोरोना संकटामुळे व काही तांत्रिक कारणामुळे ७,९०४ शेतकऱ्यांचे ४६ कोटी रुपये कर्जमाफीचे पैसे आले नाहीत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांशी संबंधित शेतकऱ्यांचे ३० कोटी आहेत तर केडीसीसी बँकेच्या कर्जदार खातेदारांचे १६ कोटी आहेत. दरम्यान, ३९,०७० शेतकऱ्यांचे २२९ कोटी २६ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळाने बँकांना कर्ज माफीचे पैसे आले नाहीत त्या बँकांना हमी देऊन रिझर्व बँकेने आदेशित केलेप्रमाणे त्यांना बॉण्डसुद्धा दिले आहेत त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज द्यावे लागेल. माझ्या माहितीप्रमाणे एकही शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही. ज्यांना व्यापारी बँका कर्ज देणार नाहीत, त्यांना जिल्हा बँक कर्ज देईल. विनाकारण कोणतीही समस्या नसताना प्रसिद्धीसाठी अज्ञान प्रकट करू नका.तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व दोन लाखांवरील कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना विधिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी बजेटवर उत्तर देताना भाषणांमध्ये जाहीर केली आहे. वरील दोन्ही कर्जदार शेतकऱ्यानी आपले कर्ज ३० जूनपर्यंत भरले पाहिजे. त्यानंतर माहिती घेऊन उर्वरित महात्मा फुले कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांवरील कर्जमाफीचे पैसे निधीच्या उपलब्धतेनुसार देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु; नियमित भरणारे व दोन लाखांवरील राज्यभरातील शेतकरी ३० जूनची मुदत वाढवण्याची मागणी करीत आहेत. शासनाने ती जर मान्य केली तर सवलत मिळण्यास वेळ लागेल असे वाटते.
Leave a Reply