
कोल्हापूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाचा पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडवणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे. या मोदी सरकारच्या यशस्वी एक वर्षपूर्तीबद्दल संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.देशातील अनेक राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही व्हर्च्युअल रॅली 25 जून रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या व्हर्च्युअल रॅलीला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी संबोधित करणार असून 19 हजार बूथमार्फत 20 लाख लोकांशी संवाद साधला जाणार आहे. भाजप सरकार नेहमी विविध डिजिटल माध्यमातून जनतेशी संवाद साधत असते. पश्चिम महाराष्ट्रात अशाच प्रकारे हा पहिल्यांदाच व्हर्च्युअल रॅलीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरु करणे, तसेच पाकिस्तान, बांगलादेश अफगाणिस्तान मधीलपिडीत धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा, असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केलेले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीचा कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा ही जाहीर करण्यात आल्या आहेत. शेतकरी, लघुउद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतिमान करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल असेही सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये, भगवानराव काटे आदी उपस्थित होते.
Leave a Reply