
कोल्हापूर : केडीसीसी बँकेच्या कर्मचारी विमा सुरक्षाकवच हप्त्याचा ८५ लाख रुपयांचा धनादेश एका विशेष कार्यक्रमात एलआयसीकडे प्रदान करण्यात आला.कोरोनासह अपघाती मृत्यू व इतर तसेच नैसर्गिक मृत्यूसाठी कर्मचाऱ्यांना भरघोस विमासुरक्षा देणारी केडीसीसी ही सहकार क्षेत्रातील पहिली बँक आहे, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी श्री. ए.एस. वसगडेकर यांनी काढले. कर्मचारी सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याच्यादृष्टीने बँकेने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेपोटी उतरवलेल्या विम्याचा चेक प्रदान कार्यक्रम बँकेच्या केंद्र कार्यालयात झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक आर. के. पवार होते.कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या विमा सुरक्षा कवचमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास २१ लाख रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास २२ लाख रुपये व इतर कोणत्याही कारणाने अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास १६ लाख रुपये एवढी विमा भरपाई मिळणार आहे.ज्येष्ठ संचालक अनिल पाटील म्हणाले, बँकेने गेल्या पाच वर्षात यशस्वितेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वामुळेच बँकेने देदीप्यमान प्रगती केली आहे. त्यांचाच आदर्श ठेवा, ते सर्वांच्याच पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत.कोडीको बँक एम्प्लॉईज युनियनचे आनंदराव परुळेकर म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात नोटांची देवाण-घेवाण व ग्राहकांशी संपर्कामुळे बँक कर्मचाऱ्यांची जोखीम वाढली आहे. बँक एम्प्लॉईज युनियनचे नारायण मिरजकर म्हणाले, बँक कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये, म्हणून बँकेने घेतलेली ही दक्षता आहे.यावेळी जेष्ठ संचालक आर. के. पवार, अनिल पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, कोडीको बँक एम्प्लॉईज युनियनचे आनंदराव परुळेकर, बँक एम्प्लॉईज युनियनचे नारायण मिरजकर आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले. सूत्रसंचालन सौ. स्वाती कुंभार यांनी केले. आभार सुनील वरुटे यांनी मानले.संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, गेल्या पाच वर्षात बँकेच्या संचालक मंडळाने मीटिंग भत्ता सोडून बँकेकडून कोणताही लाभ, सुविधा घेतलेली नाही. दरम्यान, विमाधारकांची संख्या वाढल्यामुळे हप्ता कमी बसतो म्हणून संचालक मंडळाचा यामध्ये समावेश झाला आहे. परंतू; विम्याच्या हप्त्याचा बोजा बँकेवर पडू देणार नाही, तो खर्च संचालक स्वतः करणार आहेत.
Leave a Reply