मायक्रो फायनान्सच्या नावाखाली सामान्यांवर दबाव टाकणारी वसुली यंत्रणा ताळ्यावर आणा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 

कोल्हापूर: मायक्रो फायनान्स म्हणजेच सूक्ष्म अर्थकारणाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेला मोठा प्रयत्न होय. या माध्यमातून फेरीवाले, महिला बचत गट, छोटे व्यापारी, शेतकरी इत्यादींना १० हजार रुपया पासून ५० हजार रुपया पर्यंत कर्ज देण्यात येते. हे कर्ज स्वीकारत असताना लोकांच्या कडून विविध कर्ज रोख्यांवर सह्या घेतल्या जातात. सर्व सामान्यांची निकड व गरज पाहून या लोकांना भरमसाठ व्याजाला बळी पाडले जाते व मायक्रो फायनान्सच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम या फायनान्सच्या कर्मचा-यांकडून चालू आहे. या विषयासाठी आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सदर केले. तसेच भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या राजरोसपणे आपली दुकाने थाटून बसले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील कर्जदारांना शोधण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामास ठेवण्यात आली आहे. गोड बोलून व विविध भूलथापा सांगून अशा गरजू कर्जदारांना या दुकानांपर्यत आणण्यात येते त्यानंतर त्यांच्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या जातात व त्यांना कर्ज वितरीत करण्यात येते. त्यानंतर या कर्ज दारांकडून एखादा हप्ता देखील तटला तर त्याच्या वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची एजन्सी नेमून त्यातून कायद्याला धाब्यावर बसून कर्जदात्याकडून सक्त वसुली केली जाते. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचे संकट वाढायला लागल्या नंतर केंद्र सरकार, राज्य सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी भारतातील कोणत्याही नागरीकांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करण्यात येऊ नये असे निर्देश जारी केले होते. परंतु याही निर्देशांना न जुमानता ऑगस्ट महिन्यापासून ही वसुली करणारी यंत्रणा पुन्हा कार्यरत झाली आहे. या दडपशाहीतूनच अनेक कर्ज दात्यांचे संसार उघड्यावर आले आहेत त्यामुळेच येणा-या काळात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यव्स्थेची परिस्थिती बिघडू शकते असा आमचा कयास असल्याचे सांगीतले.याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरु असणारी वसुलीची पद्धत जाचक असून पैसे गोळा करण्यासाठी ते आता एखाद्याच्या घरात जाणे, आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे तसेच घरातील किमती वस्तू उचलून नेण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. मार्च २०२० च्या आगोदर या मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून चालणाऱ्या अर्थ कारणाबाबत कोणालाच जास्त माहिती नव्हती परंतु कोरोना महामारी नंतर चालू झालेल्या सक्त वसुलीच्या प्रकारानंतर या मायक्रो फायनान्स कंपन्या म्हणजे मोठ्या प्रमाणात व्याज घेणाऱ्या वित्तीय संस्था आहेत हे आता नजरेस येऊ लागले आहे. वर्षाला ३० ते ४० टक्यापर्यंत व्याजाची वसुली यांच्या माध्यमातून सुरु आहे. वसुलीसाठी येणा-या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्व सामान्य नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत व यातूनच ही यंत्रणा समाजाला कलंक ठरत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असणा-या मायक्रो फायनान्स कंपन्यांची योग्य ती माहिती घेऊन वसुलीसाठी येणाऱ्या अनधिकृत एजन्सी तातडीने बंद करण्याच्या सुचना द्याव्यात व सर्व सामान्य नागरीकांना विनाभीती तक्रार नोंदवण्यासाठी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात टोल फ्री नंबरची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.शिष्टमंडळाच्यावतीने दिलेल्या निवेदनाबाबत सांगताना नूतन जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले, फसवणूक झालेल्या किंवा तक्रारदारांनी स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हा अधीक्षक कार्यालय यांकडे संपर्क साधावा. मायक्रो फायनान्स तक्रारीबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही त्यांच्यार कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले. तिरुपती काकडे यांनी पोलीस प्रशासनाकडून याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना संगीतले, मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत तक्रारीसाठी पोलीस कंट्रोल रूमच्या १०० नंबर वर तक्रार दाखल करण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर या तक्रारींसाठी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत तक्रार कोणाकडे करायची याची जनजागृती होणे गरजेचे असून तक्रारदारांनी स्थानिक पोलीस स्टेशन, १०० नंबर किंवा ज्यांना शक्य नसल्यास त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बिंदू चौक येथील कार्यालयात तक्रार अर्ज करावा त्यांना याबबत सर्वतोपरी सहकार्य करणात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.याप्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, अमोल पालोजी, जिल्हा चिटणीस सुनीलसिंह चव्हाण आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!