
कोल्हापूर : कोरोना बरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.
संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी आयोजीत दक्षता बैठक ते बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक झाली. महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाले, कोल्हापूरात २०१९ मध्ये महापूराने हाहाकार उडवला होता. अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. २०१९ चा अनुभव पाठीशी असल्यामुळे गेल्या वर्षी योग्य वेळी घेतलेली दक्षता व पूर्व नियोजन यामुळे पुरपरिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य झाले होते. यावर्षी ही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे कोरोना बरोबर संभाव्य पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. पूर्व नियोजन असेल तरच कोरोना व संभाव्य पूरस्थिती अशा दोन आपत्तींच्या आघाडीवर लढताना प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिकांची तारांबळ टाळता येणे शक्य आहे.
कळंबा तलाव भरला तर ओढयातील पाण्यास फुग येऊन जरगनगर, रामानंद नगर भागातील काही घरात पाणी जाते, हे टाळण्यासाठी तेथील कृषी खात्याचा बंधारा स्वच्छ करुन घ्या. शहरातील सर्व ओढे व नाल्याची साफसफाई करून घ्यावी. ज्या छोटे नाल्याच्या जेसेबी जात नाहीत तेथे छोटे जेसेबी किंवा कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता करून घ्यावी. धोकादायक झाडे, फांदया पावसाळ्यापूर्वी काढून घ्यावीत. जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीची पाहणी करून, नागरिकांना सूचना द्याव्यात, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार व गेल्या वर्षीच्या अनुभवानुसार काम सुरू असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगीतले.
गेल्या वर्षी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या सूचने नुसार बालिंगा पंपीग स्टेशन उंचावर घेण्यात येत आहे. त्या ठिकाणी सबमर्सिबल व व्हर्टिकल पंप बसविण्यात आलेत. त्यामुळे पूरपरिस्थितीमध्ये ही शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगीतले.
उपायुक्त नितीन देसाई, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, जल अभियंता एन. एस. साळोखे, आपत्ती व्यवस्थापक रणजीत चिले, ड्रेनेज चॅनेल सफाई स्वप्निल उलपे, समीर व्याघ्रमबरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply