
कोल्हापूर/प्रतिनिधी: “वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा” या करिता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 18 जून हा राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात येणार आहे.संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमध्ये हा निषेध दिन पाळण्यात येणार आहे.तसेच इतर सर्व वैद्यकीय संघटना यामध्ये फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा),होमिओपॅथी
असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए)यांचाही पाठिंबा असणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव म्हणाल्या”
जानेवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोवीड-१९ ची साथ ही एक आंतरराष्ट्रीय चिंतेची आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केले. भारतात ही साथ साधारण मार्च 2020 च्या आसपास सुरू झाली. 24 मार्च 2020 ला पहिली टाळेबंदी आपल्या माननीय पंतप्रधानांनी जाहीर केली. तेव्हापासून आजतागायत जगात १७.५ कोटी, भारतात २.९५ कोटी आणि महाराष्ट्रात ५९.०८ लाख लोक या विषाणू चे संसर्गामुळे आजारी पडले. अनेक लोकांनी आपले प्राण त्यात गमावले. या आजाराचा सर्वसाधारण जागतिक मृत्युदर २.१६ टक्के आहे. सुदैवाने भारतात हा मृत्युदर १.२७ टक्के आहे. म्हणजे जागतिक सरासरीपेक्षा भारतामध्ये कोवीड मुले बळी पडलेल्यांची संख्या नक्कीच अतिशय लक्षणीयरीत्या कमी आहे. हा मृत्यू दर कमी राखण्यामध्ये चांगल्या राजकीय निर्णयांचा आणि प्रशासकीय अंमलबजावणीचा हात आहे तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वाटा हा आपल्या देशातल्या आरोग्य यंत्रणेचा आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. भारतात निती आयोगाच्या आकडेवारीनुसार आपल्या देशातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही खाजगी आरोग्यसेवा घेते. म्हणजे हा कोवीड मुळे होणारा मृत्यू दर कमी राहण्यामध्ये खाजगी आरोग्य यंत्रणाचा सिंहाचा वाटा आहे हे उघड सत्य आहे. सर्वसाधारण शासकीय आकडेवारी बघितली तरी शासकीय कोवीड काळजी केंद्राच्या किमान चार पट ही खाजगी कोवीड हॉस्पिटल्स आहेत.असे असताना देखील दुर्दैवाने गेल्या दीड वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणांवर,आरोग कर्मचाऱ्यांवर आणि रुग्णालयांमध्ये जास्त हल्ले व्हायला लागले आहेत.अगदीच मागच्या दोन आठवड्यांमध्ये जरी विचार केला तरी आसाम ,पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा सर्व ठिकाणी रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत . फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तर गेल्या दीड वर्षात रुग्णालयातील शारीरिक हिंसाचाराच्या १५ घटना घडलेल्या आहेत.म्हणजे सर्वसाधारण दर महिन्याला एक तरी डॉक्टर हा कुठल्यातरी रुग्णाच्या नातेवाईकांच्या हल्ल्याचा बळी ठरतो किंवा कमीत कमी एक रुग्णालय हे हल्ल्याचा बळी ठरतं आहे.आणि तिथल्या मालमत्तेचे नुकसान होते. अशा पद्धतीने होणारे हल्ले हे, पुरोगामी, अतिशय सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या आपल्या राज्याला नक्कीच भूषणावह नाही. किंबहुना हे कुठल्याही सुसंस्कृत आणि निकोप समाजाला भूषणावह नाही.
अशा रीतीने रुग्णालयावरील हिंसाचार, आरोग्य यंत्रणा वरील हिंसाचार ही अतिशय काळजी करण्याची चिंताजनक गोष्ट आहे. रुग्णालयांवर हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा आंध्रप्रदेश ने नव्वदच्या दशकात केला. त्यानंतर आजतागायत भारतात २२ राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. आरोग्य हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय घटनात्मक दृष्ट्या असल्यामुळे हे कायदे राज्यांनी केले असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रात, महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना आणि वैद्यकीय व्यवसायिक हिंसाचार प्रतिबंध आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 2010 हा अस्तित्वात आहे. परंतु गेल्या 11 वर्षांत या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.यासाठी आता सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी याविरोधात लढा उभारण्यासाठी उद्याचा निषेध दिन हे त्यातील पहिले पाऊल आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने उद्या संपूर्ण कामकाज काळ्या फिती लावून करण्यात येणार आहे तसेच जे मेडिकल चे विद्यार्थी आहेत त्यांनाही यात सहभागी करून घेतले जाणार आहे.प्रत्येक हॉस्पिटलमध्ये निषेधाचे फलक लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 45 हजार आय.एम.ए चे सदस्य यात सहभागी होणार आहेत. असे डॉ.आशा जाधव म्हणाल्या. यावेळी केएमएचे सचिव डॉ.किरण दोशी, खजनिस डॉ.ए. बी.पाटील,सल्लागार समिती सदस्य डॉ. रवींद्र शिंदे,डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ.रमाकांत दगडे,डॉ.नीता नरके,डॉ.शुभांगी पार्टे, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ.शीतल देशपांडे, डॉ.पद्मराज पाटील,डॉ.निरुपमा सखदेव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply