
कोल्हापूर/प्रतिनिधी:एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिविल सर्विसेस विद्या शाखेच्यावतीने ऍडमिनिस्ट्रेशन या दोन अभ्यासक्रमांची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. बारावीनंतर चार वर्षाचा बी.ए हा पदवी आणि पदवीनंतर तीन वर्षाचा एम.ए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम एमआयटीमध्ये सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे यूपीएससी आणि एमपीएससी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम फायद्याचा ठरणार आहे, अशी माहिती एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनोव्हेशन चे प्रकल्प संचालक तेजस कराड आणि एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिविल सर्विसेस विद्याशाखेचे संचालक सुधीर धर्मपात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुजित धर्मपात्रे म्हणाले” एमआयटी आर्ट डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम देणारी ही पहिलीच संस्था असावी. या अभ्यासक्रमात यूपीएससी व राज्य पीएससी म्हणजे एमपीएससीची तयारी करून घेतली जाणार आहे. पदवीचा चार वर्षाचा अभ्यासक्रम असून चौथे वर्ष हे इंटरंशिपचे वर्ष असणार आहे. तर एम.ए चा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असून तिसरे वर्ष हे इंटरंशिपचे वर्ष असेल. यामुळे विद्यार्थ्यांचा पदवीनंतरचा स्पर्धा परीक्षांचा तयारी करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व घडविण्यासाठी याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीनही स्पर्धा परीक्षांच्या टप्प्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका संबंधित विषयांच्या तज्ञांकडुन तपासुन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा पदवी अभ्यासक्रम निवासी असून मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जाणार आहे. युपीएससी-एमपीएससी परीक्षेमध्ये येणार्या अपयशामुळे खचून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यांनी कुठलेही टोकाचे पाऊल न उचलता हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची संधी मिळू शकते. तसेच ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जाता येणार नाही त्यांच्यासाठीही एमआयटी इतर कोर्सेस मार्फत त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एमआयटी च्या वतीने ‘सुपर ट्वेंटी’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये एक प्रवेश परीक्षा घेऊन त्यातील पहिल्या वीस येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम मोफत शिकवला जाणार आहे.
तेजस कराड म्हणाले” देशाच्या उभारणीसाठी युवकांना तांत्रिक ज्ञानाचा सोबतच मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून एमआयटी च्या माध्यमातून लोकसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा आमचा मानस आहे. यासाठीच या नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आम्ही सुरुवात करत आहोत. देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होईल असा विश्वास आम्हाला वाटतो.
Leave a Reply