
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील अपुरा रक्त साठा व त्यामुळे रक्तासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय जाणून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, शेतकरी सहकारी संघ, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व महापालिका आयुक्त यांनी मिळून शाहू ब्लड बँकेची सुरुवात केली. कै. शिवराम गद्रे,कै. डॉ. यशवंत जाधव,कै. मोतीलाल दोशी यांच्या पुढाकाराने रोटरी समाज सेवा केंद्राची इमारत बांधली व त्यासाठी कै. सखारामपंत घाटगे यांचे सहकार्य लाभले. आणि त्याकाळी पहिल्या मजल्यावर शाहू ब्लड बँकेची सुरुवात झाली. रक्तदान करण्याची लोकांमध्ये मानसिकता नव्हती. लोक स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढे येत नव्हते. पण त्यावेळी विविध संस्थांमध्ये गावोगावी जाऊन रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, हे दाखवून त्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करून रक्त संकलन करण्याचा प्रयत्न गेली पंचेचाळीस वर्षे सातत्याने कोल्हापूर मध्ये शाहू ब्लड बँक करत आहे. त्याकाळी लावलेले छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. रोटरी क्लब कोल्हापूर यांच्या मॅचिंग ग्रँट माध्यमातून ब्लड बँकेस आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली.
महिन्याला २५०० ते ३००० रुग्णांना रक्त पुरवठा करणे शक्य झाले आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात अद्ययावत गोष्टींचा अवलंब झाला पाहिजे. नवीन उपक्रम राबविले गेले पाहिजेत. यासाठी रक्ताची चाचणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करून रुग्णांना अधिक सुरक्षित रक्त देण्यासाठी कोल्हापुरात प्रथमच आधुनिक यंत्रणा आणली. याचा चांगल्या प्रकारे उपयोग रुग्णास झाला आहे. पण २००८-०९ च्या दरम्यान खासगी ब्लड बँक यांना परवानगी देण्यात आली. या ब्लड बँकांची स्पर्धा न करता शाहू ब्लड बँकेने गुणवत्ता व दर्जा याबाबत कधीही तडजोड केलेली नाही.उलट रुग्णांना सुरक्षित रक्त देणे हाच उद्देश ठेवला आहे. आज ही बँक रोटरी समाजसेवा केंद्राने बांधलेल्या नवीन इमारतीमध्ये चार हजार स्क्वेअर फूट इतक्या प्रशस्त जागेत ही शाहू ब्लड बँक स्थलांतरित होत आहे. कोल्हापुरातील रुग्णांसाठी अनेक नवनवीन अत्याधुनिक यंत्रणा आणून कोल्हापूरचा रुग्णांना दिलासा देण्याचे काम शाहू ब्लड बँकेने केले आहे.हा नूतन वास्तू स्थलांतर सोहळा येत्या शुक्रवारी १६ जुलै रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार हसन मुश्रीफ, राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इथून पुढे शाह राजर्षी शाहू ब्लड बँक ब्लड सेंटर नावाने संबोधली जाणार आहे. तसेच या सोहळ्यामध्ये प्लाजमा दान करणाऱ्या लोकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. खाजगी ब्लड बँकांमध्ये रक्तदान केल्यानंतर गिफ्ट दिले जाते याला बळी पडू नये तसेच शासनाचा मदतीमध्ये सातत्य असावे बॅग व किट शासनाकडून योग्य वेळी मिळाव्यात, अशी मागणी यावेळी व्ही. बी. पाटील यांनी केली.पत्रकार परिषदेस सचिव महेंद्र परमार, खजनिस राजीव पारीख,डॉ.अक्षता पवार उपस्थित होते.
Leave a Reply