थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : आ.चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर शहरात वीज बिलांची सक्तीने वसुली सुरु असून, वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आमदार जाधव म्हणाले, राज्यात वीज बील वसूलीचे प्रमाण कोल्हापूरत सर्वात चांगले असून, वीज गळती शुन्य आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सर्वांचेचे अर्थकारण बिघडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आद्याप कमी आलेला नाही. गेल्या चार महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार व व्यवसाय बंद आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार गेलेत, मोठया संख्येने नोकर वर्ग घरी बसून आहे. एकंदर सरकारच्या निर्बंधामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक सर्वचजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घर कसे चालवायचे अशा विवेचंनेत असलेल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीने शॉक देत आहे. वितरण कंपनी व ग्राहक यांचे नाते कायमस्वरूपीचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांशी थेट संवाद साधून चर्चेतून वीज बिलाची वसुली करता येते ; मात्र वितरण कंपनीच्या काही कर्मचाऱ्याची भाषा अरेरावीची आहे, हे बरोबर नाही.
नागरिक आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे वीज बिल थकीत आहेत. सरकारने निर्बध शिथील केले आणि जनजीवन पूर्वपदावर आले की सर्वच ग्राहक वीज बिल भरणार आहेत. त्यामुळे वितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वीज बिलाचे हफ्ते करून देत, चर्चेतून मार्ग काढावा ; मात्र ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करू नये असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
दुकानाच्या सुरक्षीततेसाठी सिसिटीव्ही कॅमेरा व अलार्म व्यापाऱ्यांनी सुरु केलेत. पूर्व सूचना न देता दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची तक्रार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली. सोमवारच्या एमआयडीसी बंद असताना उद्योगाचा विज पुरवठा खंडीत केला जात असल्याची तक्रार गोशीमाचे श्रीकांत पोतनीस यांनी केली.
विज बील भरण्यासाठी हफ्ते योजना पुन्हा सुरू करावी व उद्योजकांच्या समस्याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्याची मागणी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली.
वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे म्हणाले, वीज बील वसुलीचा प्रचंड ताण आहे. काही कर्मचाऱ्याकडून चुकीची भाषा वापरली जाते. यामुळे थकबाकी वसुलीचे काम महिला कर्मचाऱ्यांना दिले होते, परंतु महिला कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे अडचण येत आहे.
कार्यकारी अभियंता एन. आर. गांधले म्हणाले, ग्राहकांशी सौजन्याने बोलण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येतील, तसेच वीज बिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित अस्वले म्हणाले, नोव्हेंबर 2020 पूर्वीचे थकीत बील व पाच हजार रूपयांच्या वर रक्कम असेल तरच पुरवठा खंडीत केला जात होता ; मात्र आता आमदार जाधव यांच्या सूचनेनुसार वीज पुरवठा खंडीत न करता, चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. बील भरण्यासाठी हफ्ता व मुदत देण्यात यईल.
यावेळी मॅकचे उपाध्यक्ष संजय पेंडसे, दिपक चोरगे, अजित कोठारी, शिवाजीराव पवार, प्रशांत शिंदे, संपत पाटील, राहुल नष्टे, तेजस धडाम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!