कोल्हापुरी प्रेमाचा रांगडा बाज – जीव माझा गुंतला

 

कोल्हापूर/प्रतिनिधी:आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला या मालिकेत अनुभवणं आता रंजक असणार आहे.

दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर ? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी – सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा फुलू लागलेलं प्रेम असेलच असं नाही. काहीवेळा प्रेमाची परिभाषा कळायला काही काळ जावा लागतो. ज्या व्यक्तीसोबत आपले विचार जुळत नाहीत, भांडणं होतात त्या व्यक्तीवर प्रेम जडू शकत नाही असं काही नसतं, त्या प्रेमाची जाणीव मात्र जरा उशिरा होते. जसं अग्नी आणि पाणी कधीच एकत्र येऊ शकत नाही पण त्यांनी सोबत असण गरजेचं असतं म्हणजेच एकमेक एकमेकांवर हावी होत नाही. अगदी तसंच आयुष्याचाही समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं असणं हीदेखील सहजीवनाची गरज असते. हाच वेगळेपणा त्यांच्या प्रेमात एक रांगडा बाज घेऊन येतो, मग अशा प्रेमाला व्यक्त व्हायला शब्द देखील अपुरे पडतात. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे तिच्यासोबतच साता जन्माच्या गाठी जुळल्या तर ? असा कुठला नात्यांचा गुंता उद्भवतो ज्यामुळे अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार लग्नासाठी तयार होतो. या द्वेषाची जागा प्रेम घेऊ शकेल का . कसा रंगेल या कहाणीचा करार .हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!