
कोल्हापूर/प्रतिनिधी:कोरोना संक्रमण प्रतिबंधाच्या नावाखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मनमानी कारभाराचा खेळ मांडला आहे. स्थानिक सामान्य भक्तांना देवीचे दर्शन घेण्यापासून वंचित ठेवणारी ई पास प्रणाली दोन दिवसात बंद झाली नाही तर शिवशाही कोल्हापूर त्याविरोधात सामान्य भक्तांसह तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवशाही फाउंडेशनच्यावतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आला.
अंबाबाई मंदिरात देशभरातून भाविक येतात. तसेच स्थानिक भाविकही मोठ्या संख्येने येत असतात. दिवसभरातील वेगवेगळ्या आरती, शुक्रवारची पालखी यासाठी नित्यनियमाने या येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. ई पासमुळे त्यांना अडथळा निर्माण होत आहे. त्यात मुखदर्शनही व्यवस्थित होत नाही. अंबाबाई मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांवर मंदिर परिसरातील व्यापारी, फेरीवाले, हॉटेल आणि रेस्टॉरंट, यात्रीनिवास,रिक्षाचालक यांचे व्यवसाय अवलंबून आहेत. भाविकांची संख्या वाढली नाही तर त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. याचा विचार देखील करणे आवश्यक आहे. ई पासची व्यवस्था त्वरित थांबून पूर्ववत दर्शन व्यवस्था सुरू केली नाही तर शिवशाही फाउंडेशन कोल्हापुरातील सामान्य भाविकांसाठी तीव्र आंदोलन करेल व भाविकांना न्याय मिळवून देईल असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला. यावेळी शिवशाहीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सामंत, स्वप्नील सोनवणे, राजू मिरजकर, महेश खोपडे ,शिवम अहिरेकर, आदर्श शिंदे, प्रशांत पेडणेकर, रितेश चौगुले, मिलिंद कुलकर्णी, संजय चव्हाण, गणेश लाड, राहुल नाईक, ऋषिकेश मोरे आधी उपस्थित होते.
Leave a Reply