
कोल्हापूर : सुशोभिकरणानंतर महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महावीर गार्डन व हुतात्मा पार्कसाठी पहिल्या टप्यात एक-एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, दुसऱ्या टप्प्यात महावीर गार्डनसाठी दोन कोटी तर हुतात्मा पार्कसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतून महावीर गार्डन व हुतात्मा पार्कच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाला. श्रीमती जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होत्या. दिवंगत आमदार जाधव यांच्या स्मृतीप्रत्यर्थ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपन करून, कामाचा शुभारंभ करण्यात आला.पालकमंत्री पाटील म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी शहराच्या विकासाचे रोल मॉडेल तयार केले होते. यामध्ये शहरातील सर्व गार्डनचे सुशोभिकरण करण्याचा आण्णांचा मानस होता, कारण राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोल्हापूर येतात. पर्यटकांनी चार – आठ दिवस कोल्हापूरात रहायला पाहिजे. करवीर निवासनी श्री महालक्ष्मी, भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ व समाधी स्थळाला पर्यटकांनी भेट दिली पाहिजे. त्यानंतर संपूर्ण दिवस पर्यटकांचा गार्डनमध्ये रमला पाहिजे. यासाठी कोल्हापूरातील गार्डन सुसज्ज व सर्व सोयीनयुक्त पाहिजेत, या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर महावीर गार्डन व हुतात्मा पार्कच्या सुशोभिकरणाचा आराखडा आण्णांनी खासगी संस्थेकडून स्वतःचे पैसे देऊन तयार केला होता. त्यासाठी गेल्या वर्षी पहिल्या टप्यात दोन्ही उद्यानासाठी प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता, तर यावर्षी महावीर गार्डनसाठी दोन कोटी आणि हुतात्मा पार्कसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
हुतात्मा पार्कचे सुशोभिकरण या निधीतून पूर्ण होणार आहे. यामध्ये आण्णांच्या सुचनेनुसार एक ही झाड न तोडता, स्काय वॉकची उभारणी करण्यात येणार आहे. आण्णांच्या संकल्पनेतून मुंबई नंतर पश्चिम महाराष्ट्रात स्काय वॉकची उभारणी हुतात्मा पार्कमध्ये होणार आहे. तसेच स्मारक भिंतीची उभारणी करण्यात येणार आहे. ज्यावर बलिदान दिलेल्या हुतात्म्याची नावे कोरण्यात येणार आहेत. पार्कमधील मध्यवर्ती स्मारकाचे पूनरज्जीवन करण्यात येणार आहे, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे ऑपन थिएटरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगीतले.महावीर गार्डन शहराच्या मध्यवस्तीत व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे. यामुळे येथे पहाटे पासून रात्रीपर्यंत अबालवृध्द नागरिकांची असते. यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन, सुशोभिकरण प्रकल्प तयार केला आहे. लहान मुलांसाठी अद्यावत व साहसी खेळ तर जेष्ठ नागरिकांसाठी विशेष वॉकीग ट्रक बांधण्यात येणार आहे. महावीर गार्डनमधील दुर्मिळ वृक्षसंपदेचे जतन करण्यात येणार असून, त्याची माहिती सर्वांना मिळावी, यसाठी तरतूद करण्यात येणार आहे. महावीर गार्डनमधील ऐतहासिक ठिकाणांना उजाळा देण्यात येणार आहे. तसेच महावीर गार्डनमध्ये भगवान महावीरांचा पुतळा उभारणीबाबत शासकीय व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिले.या विकासकामाचे उद्घाटन करताना आण्णांची उणिव प्रकर्षाने जाणवत आहे. आज आण्णां नाहीत, मात्र आपण सर्वांनी आता जयश्री वहिनीना साथ देणे गरजेचे आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार आहे, तसेच राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्या सोबत चर्चा करणार असल्याचा पुर्नउच्चार पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केला.कोल्हापूरच्या जनतेने आण्णांना दिलेले भरभरून प्रेम व आशिर्वाद पाहून मन भरून येत आहे. कोल्हापूरच्या विकासाचे आण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज पर्यंत आण्णांना साथ दिलात, तसेच पाठबळ मलाही द्यावे अशी अपेक्षा श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.संभाजी जाधव, सत्यजित जाधव, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, भिमराव पवार, पूजा नाईकनवरे, प्रदेश महिला कॉग्रेसच्या सरलाताई पाटील, महिला कॉग्रेस शहराध्यक्ष सध्या घोटणे, राजेश लाटकर, आनंद माने, माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते, संजय शेटे, राहुल चव्हाण, सुनिल मोदी, रमेश पुरेकर, अनिल कदम, प्रकाश पाटील, प्रकाश कुंभार, सुजय पोतदार, महेंद्र चव्हाण, दिपक थोरात, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, सुभाष बुचडे, माधुरी लाड, अशोक जाधव, सागर पवार, शिवानंद बनछोडे, विनायक फाळके, सचिन पाटील, संदिप कवाळे, प्रकाश गवंडी, रत्नेश शिरोळकर, महेजबीन सुभेदार, दुर्गेश लिंग्रस, श्रीकांत माने, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल यांच्यासह माजी नगरसेवक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन अनिल घाटगे यांनी केले.
Leave a Reply