
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्याला ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच ‘वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने यात पुढाकार घेतला आहे. यासाठी इतर २२ वैद्यकीय संघटनाही यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याबाबत आयएमए कोल्हापूरसह विविध वैद्यकीय संघटनांची आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बैठक पार पडली.मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व समन्वयक डॉ.संदीप साळोखे यांनी बैठकीचे नियोजन केले होते. कोल्हापूर हे वैद्यकीय पर्यटनासाठी कसे विकसित करता येईल यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली. दृकश्राव्य माध्यमाद्वारे सध्या कोल्हापुरात कोणत्या उपचार पद्धती व यंत्रणा उपलब्ध आहेत याची माहिती देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत हॉस्पिटलमध्ये परदेशातील उपचारपद्धती प्रमाणे तितक्याच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त अद्ययावत उपचार यंत्रणा आपल्या इथे उपलब्ध असून त्यांचा खर्चही माफक आहे. तात्काळ उपचार, थ्रीडी निदान यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ व उच्चशिक्षित डॉक्टर्स, गुणवत्तापूर्वक उपचार पद्धती व कमी खर्चात उपचार यामुळे कोल्हापूर जिल्हा हा निश्चितच वैद्यकीय पर्यटनास अनुकूल आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही इथे अधिक आहे. त्यामुळे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अफगाणिस्तान व इतर बऱ्याच देशातून रुग्णांनी कोल्हापुरात उपचारासाठी येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडे काय आहे यापेक्षा रुग्णाची गरज किंवा ते काय शोधतात हे पाहून त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्र विकसित केले तर कोल्हापूर हे वैद्यकीय केंद्र नक्कीच बनेल. सर्व हॉस्पिटल्सनी डिजिटल नोंदणी पूर्ण केली आहे.असा प्रस्तावही यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर मांडण्यात आला. कोल्हापूरात चांगले पाणी, शुद्ध हवा, कमी प्रदूषण यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्यासाठी पोषक वातावरण आहे. यासाठी डॉक्टरांबरोबरच शासनाकडूनही आवश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी तज्ञ डॉक्टरांनी मांडले.नुकतेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर ला भेट दिली होती.कोल्हापूर हे पर्यटन केंद्र बनण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय पर्यटनास वाव आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासनाकडून यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. विमानतळाचे काम लवकरच पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटनास चालना मिळावी यासाठी शासन प्रयत्न करेल. त्या त्या देशातील दूतावासाची पत्रव्यवहार करेल. एक चांगला कार्यक्रम राबवून त्या देशातील रुग्ण कोल्हापूरलाच उपचारासाठी कसे प्राधान्य देतील यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवावी लागेल. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे. शाहू महाराजांनी देखील वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता. कोल्हापूरला कला, संस्कृती, खाद्य, तीर्थक्षेत्र यांची देणगी आहे. तसेच वैद्यकीय वारसा मिळण्यासाठी व तो जपण्यासाठी शासन नक्कीच सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.बैठकीस डॉ. संदीप साळोखे, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. किरण दोशी, डॉ. पी.एम.चौगुले, डॉ. संतोष प्रभू, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ.ए.बी.पाटील, डॉ. महादेव मिठारी, डॉक्टर बी.डी.पाटील, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. संजय देसाई, डॉ. सुनील पाटील, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. रचना संपतकुमार, डॉ.अद्वैत आफळे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. संतोष निंबाळकर, डॉ. आनंद कामत, डॉ.मंदार जोगळेकर,गीता आवटी महेश पटवर्धन आदी उपस्थित होते.
Leave a Reply