असंघटित कामगारांचे जीवनमान उंचावणार:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

 

कागल:महाराष्ट्रात ११ कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी पाच कोटी कामगार आहेत. केवळ ८० लाख कामगारच नोंदलेले, संघटित आहेत. उर्वरित असंघटित कामगारांसाठीही शेतमजूर कल्याणकारी मंडळ, ड्रायव्हराचे कल्याणकारी मंडळ व यंत्रमाग धारक अशा विविध कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून योजना राबवून त्यांचेही जीवन जीवनमान उंचावणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कागल शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये श्री. महादेव मंदिरासमोर आयोजित बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्यासह शैक्षणिक व आरोग्याच्या आर्थिक सहाय्य याचे मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. नगरसेवक प्रवीण काळबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांच्या आयुष्याचे कोटकल्याण करण्याची क्षमता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आहे. हे मंडळ म्हणजे बांधकाम कामगारांसाठी न आटणारा समुद्र आहे. कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. एकही कामगार कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. बांधकाम कामगार नोंदणीच्या माध्यमातून सामाजिक क्रांती होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन यांनी व्यक्त केला प्रास्ताविकात माजी नगरसेवक प्रवीण काळबर म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खंबीर पाठबळामुळे प्रभागातील सर्वच विकासकामे मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आहे . आता महिलांच्या हाताला काम मिळवून देणे व बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे . मंत्री मुश्रीफांच्या मार्गदर्शनाखाली कागल पंचतारांकित एमआयडीसीत एखादे युनिट सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, माजी नगरसेवक संजय ठाणेकर, श्रीमती कांचन धनवडे यांचीही भाषणे झाली.माजी नगराध्यक्षा आशाकाकी माने, नगरसेवक सतीश घाटगे, पत्रकार अतुल जोशी, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक बाबासो नाईक, नगरसेविका माधवी मोरबाळे, संजय ठाणेकर, सुनील माळी, अस्लम मुजावर, संजय चितारी, प्रमोद पाटील, सुनील माने, विकास पाटील, पद्मजा भालबर, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, बाबासो पखाली, अर्जुन नाईक, संग्राम लाड, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!