
कोल्हापूर:पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 पैकी तब्बल 91 जागा जिंकून आम आदमी पार्टीने निर्विवाद सत्ता मिळवली. पंजाब निवडणुकीचे निकाल लागताच आम आदमी पार्टीने कोल्हापुरात एकच जल्लोष केला. उद्यमनगर येथील प्रचार कार्यालयात जमून ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सवाची सुरुवात झाली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून मिरजकर तिकटी, निवृत्ती चौक, गंगावेश मार्गे छ. शिवाजी चौक, बिंदू चौक, दसरा चौक येथे येऊन महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित नागरिकांना साखर-पेढे वाटून विजय साजरा केला.पंजाबचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. पंजाबच्या जनतेने विकासाचे दिल्ली मॉडेल स्वीकारले. ‘आप’चा वारू आता देशभर पसरणार, विशेषतः कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये या निकालांचे परिणाम दिसतील असा विश्वास ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी व्यक्त केला.’पंजाब तो बस झांकी है, कोल्हापूर अभी बाकी है’ अशी गर्जना आता ‘आप’ने केली आहे. शहरात जागोजागी या आशयाचे पोस्टर सायंकाळी बघायला मिळाले. दिल्ली आणि पंजाब नंतर ‘आप’च्या रडारवर कोल्हापूर असल्याचे देसाई यांनी सांगितले.यावेळी निलेश रेडेकर, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, संतोष घाटगे, अमरजा पाटील, मोकाशी, आदम शेख, मयूर भोसले, राकेश गायकवाड, अभिजित कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply