टॉप थाय ब्रँड- ट्रेड फेअरमध्ये कोल्हापुरातील १०० कंपन्यांचा सहभाग;लघुउद्योजकांना सुवर्णसंधी

 

कोल्हापूर: पुण्यामध्ये नुकतेच टॉप ब्रँड ट्रेड फेअर २०२२ या उद्योजकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तीन दिवसात ४७० उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या प्रदर्शनामध्ये १००हून अधिक कोल्हापूरातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तीन दिवसात ८८ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. हे व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. तसेच लघुउद्योजकांना देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले उत्पादन आणण्याची व त्याची विक्री करण्याची ही एक मोठी नामी संधी आहे, असे युथ बँकेचे संचालक चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फर्निचर, हॉस्पिटल,हेल्थ व फूड ब्रेवरीज व कॉस्मेटिक या बाबींसाठी हे प्रदर्शन भरवले गेले होते. या फेअरमध्ये तरुण उद्योजक, बचत गट, कृषी प्रक्रिया संस्था आणि शेतकऱ्यांचा अधिक सहभाग होता. डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आणि तंत्रज्ञान करारासाठी इथे नाव नोंदणी केली. भारत आणि पूर्वेकडील देश यांच्यामध्ये सांस्कृतिक समानता आणि कृषी क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था असल्याने एकत्रित व्यवसायाची समान संधी अशा प्रकारच्या प्रदर्शनातून मिळते. दोन्हीकडील शासकीय धोरणे आयाती व निर्यातीसाठी पूरक आहेत. उद्योजकांना यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता लागणार नाही. आपले एखादे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यासाठी जो काही प्रशिक्षणाचा भाग आहे तो संपुर्ण आम्ही करू अशी ग्वाही देखील चेतन नरके यांनी दिली.
तसेच ग्रामीण भागातील कृषिमाल आणि कृषि प्रक्रिया उद्योगांना देखील यामध्ये संधी आहे.महिला बचत गट, एक जिल्हा एकूण उत्पादन, हस्तकला ग्रामीण शिल्पकला, अशा कलाकुसरीवर आधारित क्षेत्रांना संधी आहे. शहरी भागातील सेवा क्षेत्र, बांधकाम, कला आणि ऑटोमोबाइल क्षेत्राला संधी आहे. तसेच आयात-निर्यातीच्या सोबत पर्यटन, तांत्रिक करार, गुंतवणूक कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीमध्ये याचा फार उपयोग होणार आहे. आयात निर्यातीसाठी भांडवल यापेक्षा इच्छाशक्तीची गरज अधिक लागते. जर सर्व उद्योजकांनी ठरवले तर ते नक्कीच आपल्या उत्पादित मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ शकतात. येत्या सहा महिन्यात भारतीय उद्योजकांना आशियातील पूर्वेकडील देशात प्रदर्शनासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे देखील चेतन नरके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!