
कोल्हापूर: येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज सुरवात झाली.प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना अभिषेक, वेदशास्त्र संपन्न सौरभ कुलकर्णी यांचे दशोपनिषद वाचन, सकाळी 8 वाजता वेदशास्त्र संपन्न रामचंद्र महाराज गंगाखेडकर यांचे गीताभाष्य आणि प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे ब्रह्मसूत्रभाष्य पारायण झाले.संजय व्यास बुवा यांचे जन्मकाळ कीर्तन सकाळी 11 वाजता झाले. त्यानंतर महिलांच्या मोठ्या उपस्थितीत पाळणा पूजन झाले. सायंकाळी 5 वाजता प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे प्रवचन झाले.यावेळी पीठाचे अध्यक्ष रामकृष्ण देशपांडे, सचिव शिवस्वरूप भेंडे, सदस्य सुरेश कुलकर्णी, बत्ते महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.दरम्यान, पुढील आठवडाभर पीठामध्ये होमहवन, कीर्तन, प्रवचन, शास्त्र सभा, पुरस्कार वितरण, षटचक्र माहिती, पुस्तक प्रकाशन व पालखी प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. यामध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. भेंडे यांनी यावेळी केले.
Leave a Reply