
दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे त्यांनी अभिनंदन केले, व उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र डेस्क सुरू करावा, अशी मागणी केली.तसेच, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी फोर्ट सर्किट टूरिझम, पर्यटन विकास या विषयांवर देखील सकारात्मक चर्चा झाली.हे वर्ष राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करावी, अशीही मागणी केली. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे विचार-कार्य जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे विशेष उपक्रम राबवावेत, अशी संकल्पना मांडली.यावेळी त्यांच्यासह नामदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, कॅ. अभिजीत अडसूळ, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव उपस्थित होते.
Leave a Reply