
सामान्य आजार म्हणजे वरचे वर होणारे, फार गंभीर नसलेले परंतु लगेच उपचार घ्यावेत असे आजार. नाक वहाणे, सर्दी होणे, खोकला होणे, कफ होणे, ताप येणे हे प्रामुख्याने होणारे सर्वसामान्य आजार. तसेच पाठदुखी, पाठीवर येणारा ताण, डोकेदुखी, पोट बिघडून जुलाब होणे, ऍसिडिटी, एखाद्या अवयवावर येणारा ताण हे सुद्धा सर्वसामान्य आजार आहेत. आपल्याकडे अशा प्रकारचा एखादा आजार झाला की त्याकडे सुरवातीला हमखास दुर्लक्ष केले जाते. परंतु असे दुर्लक्ष केल्यास हे आजार वाढू शकतात आणि ते अंगावर काढल्याने त्याचे एखाद्या गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते. त्यामुळेच आपल्या सर्वांनाच सर्वसामान्य आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
ताप : मानवी शरीराचे सामान्य तापमान ३७ अंश सेल्सियस किंवा ९८.६ अंश फॅरनहाईट असते. जर शरिराचे तापमान सामान्य पेक्षा जास्त असेल तर तो ताप असतो. ताप हा रोग नाही. ताप म्हणजे फक्त रोगाचे लक्षण आहे. ताप म्हणजे संक्रमणाची (इन्फेक्शन) शरिरावर होणारी प्रतिक्रिया आहे. ताप म्हणजे शरिरावर संक्रमणाचा होणारा परिणाम आहे. तापाचे वाढते तापमान रोगाच्या संक्रमणाची पातळी दर्शवितो.
ताप येण्याची कारणे : निम्नलिखित रोगांमुळे ताप येऊ शकतो. मलेरिया टायफाईड क्षय रोग हाडी ताप डांग्या खोकला, गालफुगी श्वसननलिकेचे संक्रमण जसे न्यूमोनिया आणि सर्दी, कफ, टॉन्सिल, दमा इ. मूत्राशयाचे संक्रमण.
तापाची सामान्य लक्षणे : शरिराचे तापमान ३७.५ से. किंवा १०० फे. किंवा त्यापेक्षा जास्त असणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, सांधे दुखी, भुक न लागणे, जुलाब, भुक मंदावणे आणि थकवा, काही सामान्य उपाय : रोग्याला स्वच्छ व खेळत्या हवेच्या खोलीत झोपवावे. त्याला जास्तीत जास्त तरल (पातळ) पदार्थ द्यावेत. रोग्याला स्वच्छ आणि सैल कपडे घालावेत. आराम करणे आवश्यक आहे. शरिराचे तापमान जर ३९.५ से. किंवा १०३.० फॅ. पेक्षा जास्त असेल किंवा ४८ तासांपेक्षा जास्त वेळ ताप राहीला तर काळजी घ्यावी व वैद्यकिय सल्ला घ्यावा.
Leave a Reply