
कोल्हापूर / प्रतिनिधी : देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने दूध उत्पादनात वाढ आणि 2030 पर्यंतचे ध्येयधोरणे ठरवण्यासाठी डेअरी क्षेत्रातील तज्ञ व सर्व घटक एकत्रित येऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता राज्यासमोर दुग्ध व्यवसाय समोरील अनेक आव्हाने आज उभी आहेत. अमोलसारखे ब्रँड राज्यांमध्ये हातपाय पसरू पहात आहेत. तसेच जागतिक तापमान वाढीमुळे आणि लंपी या आजारामुळे पशुधनांमध्ये घट होत आहे. याचा विपरीत परिणाम म्हणजे दूध उत्पादनात घट होत चाललेली आहे. ही सर्व आव्हाने पेलण्यासाठी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकार्याने शाहूपुरी जिमखाना मैदानावर भव्य डेअरी एक्सपो होणार आहे. या इंडियन डेअरी फेस्टिवलचे आयोजन 20 ते 22 जानेवारी 2023 या दरम्यान करण्यात आले आहे. दूध उत्पादकांना रोज नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पाऊस, जागतिक तापमान वाढ यामुळे पशुधनावर मोठा परिणाम होत आहे. परंतु जगाच्या पाठीवर भारताला डेअरी उद्योगांमध्ये सर्वाधिक संधी आहे. नव्या पिढीचा जर सहभाग या क्षेत्रामध्ये वाढवला गेला तर या उद्योगाचे अर्थकारण, तंत्र, महत्त्व नक्कीच वाढेल. यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक आहे, असे इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुधाची वाढती मागणी आणि दूध उत्पादनामध्ये होणारी घट याची तफावत मिटवण्यासाठी दूध भेसळीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. यावर शासनासह सर्वांनीच लक्ष केंद्रित करून कारवाई करणे आवश्यक आहे. यावरही वोहापोह या परिषदेमध्ये होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या डेअरी फेस्टिवलमध्ये दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली असणार आहे. तसेच या सर्व उपक्रमांचे व्यापक चळवळीत रूपांतर करण्याकरता विविध माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी या उद्योगाची संपूर्ण माहिती असणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. असेही डॉ. चेतन नरके यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गोकुळ चे माजी संचालक अरूण नरके यांच्यासह आबासाहेब थोरात, गिरीश चितळे, संजीव नाईक-निंबाळकर, किरीट मेहता,नेताजीराव पाटील, डॉ. जी.बी पाटील, विशाल पाटील तसेच दूध संस्थांचे चेअरमन,प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply