
कोल्हापूर :महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या अजोड कार्याबद्दल ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार देऊन ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे शाहूंच्या विचारांचा सन्मान आहे, अशा शब्दात डॉ. पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली .
कोल्हापूरचा नवलौकिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्या सुपुत्रांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार डॉ.पवार यांना जाहीर झाला होता.
प्रकृतीच्या कारणामुळे दिवाळी दरम्यान झालेल्या ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्रदान सोहळ्या वेळी त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे सोमवारी आमदार सतेज पाटील यांनी ब्रँड कोल्हापूर समिती सदस्यासोबत घरी जाऊन डॉ पवार याना सन्मानित केले.
डॉ पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करताना हा पुरस्कार हा शाहू विचारांचा सन्मान आहे.शाहू महाराजांच्यामुळे इथे पर्यंत आलो .शाहु महाराजांनी बोर्डिंग सुरू केली., त्यातील एका बोर्डिंग मध्ये राहून मी शिकलो . त्यानंतर नोकरी करत इतिहास संशोधन करत इथपर्यंत येऊ शकलो. त्याकाळात मुलांसाठी बोर्डिंग सुरू करणे हा क्रांतिकारी विचार होता. आपण कल्पना करू शकत नाही, असे शाहू महाराजांचे कार्य होते .
ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, डॉ.पवार यांनी केलेले कार्य हे भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथ संपदा ही वैचारिक समृद्धता देणारी आहे.यावेळी डॉ. पवार आणि सौ वसुधा पवार यांच्या हस्ते आ.पाटील यांना पुस्तके भेट देण्यात आली. तसेच त्यांच्यामध्ये इतिहासातील विविध विषयांवर सुमारे तीस मिनिटे चर्चा झाली.यावेळी सौ वसुधा पवार , माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, ब्रँड कोल्हापूर समिती सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य अजय दळवी,चेतन चव्हाण, प्राचार्य डॉ .महादेव नरके,डॉ.मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.
Leave a Reply