खा.धनंजय महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून आयोजित गीत रामायणाच्या मैफिलीला उदंड प्रतिसाद

 

कोल्हापूर: भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या आठवणी जाग्या झाल्या. या सांस्कृतिक पर्वणीला कोल्हापुरच्या रसिकांनी उंदड गर्दी केली होती.राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे चेअरमन पृथ्वीराज महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाटयगृहात गीत रामायणाचा कार्यक्रम सादर झाला. स्वर्गीय ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अलौंकिक प्रतिभेतून साकारलेला गीतरामायणाच्या स्वरांचा अनमोल नजराणा अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भागिरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, गायक श्रीधर फडके, भंडारी ग्रुपचे विजय भंडारी, नामदेव भंडारी, वेलनेस मेडिकलचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र सन्स, मार्केटिंगचे सौरभ कडू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा पूजनानंतर, गायक श्रीधर फडके, भंडारी ग्रुपचे विजय भंडारी, नामदेव भंडारी, वेलनेस मेडिकलचे राजेंद्र सणस, सौरभ कडू या प्रायोजकांचा सौ.अरुंधती महाडिक आणि सौ. वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रामनवमीचे औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी रसिकांसाठी हा कार्यक्रम मोफत आयोजित केला होता. यापुढेही कलानगरीसाठी अशाच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे सौ. अरुंधती महाडिक यांनी नमुद केले. कोल्हापूर ही सुधीर फडके यांची जन्मभूमी असल्याने इथे कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो, असं श्रीधर फडके यांनी नमुद केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले, सागरा प्राण तळमळला हे गीत सादर केले. त्यानंतर गीत रामायणाच्या सुरेल सोहळ्याला प्रारंभ झाला. भक्तीमय वातावरणात उत्तरोत्तर हा कार्यक्रम खुलत गेला. शब्दप्रभू ग.दि. माडगूळकर यांची अप्रतिम रचना आणि स्वरप्रभू सुधीर फडके यांचे संगीत यामुळे गीतरामायण हा कार्यक्रम सांस्कृतिक क्षेत्रात अजरामर बनलाय. रविवारच्या कार्यक्रमातही कलाकारांनी प्रत्येक गीतागणीक रसिकांच्या टाळ्या घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!