
कोल्हापूर: महाडीकांचे नातेवाईक असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या नावावर शेती आहे, मग त्यांच्या घरात अकरा सभासद कसे? असा सवाल उचगावचे माजी सरपंच कावजी कदम यांनी केला. छ. राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्यावतीने उचगाव येथे आयोजित सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती
कावजी कदम यांनी आपल्या भाषणात महाडिकांच्या अजब कारभाराचा पाढा वाचला. महाडिकांनी 28 वर्षे उसाला कमी दर देऊन आणि काटा मारून सभासदांची अक्षरश: लूट केली. उसाच्या दोन खेपा राजारामला, एक खेप बेडकीहाळ कारखान्याला आणि उसाचे बिल मात्र राजाराममधून असा कारभार करून महाडिकांनी राजाराम कारखान्याला खोलात घालून आपला बेडकिहाळचा खासगी कारखाना मोठा केला. पाणंद रस्त्यासाठी तरतूद नाही असे यापूर्वी सांगणार्या महाडीकानी आता पाणंद रस्ता निधी मंजूरीचे बोर्ड कसे लावले? असा सवाल कदम यांनी केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, छ.राजाराम कारखान्यावर जिल्ह्यातील बारा हजार सभासदांचा हक्क आहे. येलुरच्या ६०० सभासदांचा वापर महाडिक केवळ सत्तेसाठी करत आहेत. गेली २८ वर्षे कारखान्याची सत्ता भोगणाऱ्या महाडीकानी केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी चार हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्वा पासून वंचित ठेवले. सर्व सभासदांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या या लढाईत साथ द्या.सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, महाडीकांनी आजपर्यंत सभासदांची दिशाभूल केली. मात्र, त्यांच्या भूलथापाना स्वाभिमानी शेतकरी बळी पडणार नाही. यावेळी कारखान्यात परिवर्तन अटळ आहे.यावेळी उपसरपंच विराग करी, माजी सरपंच गणेश काळे, दिनकर पोवार, सुरेश मसुटे, दिलीप पोवार, राजू यादव यांच्यासह सभासद उपस्थित होते.
Leave a Reply