
गडमुडशिंगी : सभासदांचे प्रश्न सुटावेत, कारखाना हिताचे निर्णय घेण्यासाठी शेतकरी सभासद संचालकांना निवडून देतात. मात्र राजाराम कारखान्यामध्ये संचालकांना केवळ सही करायचा आणि चहा बिस्कीट खाऊन घरी यायचे एवढेच अधिकार आहेत अशा शब्दात कारखान्याचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांनी राजाराम कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवले. परिवर्तन आघाडीच्या गडमुडशिंगी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती.सर्जेराव पाटील पुढे म्हणाले, आजपर्यंत सभासदांना लुटणा-या महाडिकांनी सभासदाबरोबर संचालकांना दिलेली वागणूक अत्यंत क्लेशदायी आहे. सभासदांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी संचालकाना काही अधिकार असतात. मात्र महाडीकांनी कारखान्यात एकाधिकारशाही ठेवली आहे. अपमानास्पद वागणुकीमुळे संचालकांना कारखान्याकडे जायची इच्छा होत नाही.
पोपट दांगट म्हणाले, आमदार सतेज पाटील कारखाना आणि सभासदांच्या हितासाठी लढा देत आहे. या लढ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी सभासद पाठबळ देत कारखान्यात परिवर्तन घडवतील.
कावजी कदम म्हणाले, गेली 28 वर्षे राजाराम सहकारी साखर कारखान्याची सत्ता भोगणाऱ्या महाडिकांनी सभासदांसाठी काही केले नाही. ऊसतोडणी वेळेत होत नाही,योग्य दर मिळत नाही केवळ मताच्या तोंडावर सत्ताधारी आता गावोगावी पानंद रस्त्याच्या निधीचे फलक लावत आहेत.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सहकारी संस्था या ग्रामीण अर्थकरणाचे ऊर्जा स्त्रोत आहेत म्हणूनच हे ऊर्जास्रोत टिकावे या भूमिकेतूनच आपण छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक रिंगणात उतरलो आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा हीच आपली भूमिका आहे त्यामुळे सुज्ञ सभासदांनी या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे.
रविराज पाटील, राजू वळीवडे, प्रा निवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉ अशोक पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा बँक संचालिका स्मिता गवळी, डॉ.प्रकाश पाटील, बाबासो माळी, मधुकर चव्हाण, बसगोंडा पाटील, विलास मोहिते, यांच्यासह सभासद उपस्थित होते.
Leave a Reply