
मुंबई : राज्य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्याचं काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत सुरु आहे. या अभियानात आवर्जून सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं पुढची पिढी आपणच सक्षम बनवूया. असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दीपकजी केसरकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेला आहे.
हाच वारसा पुढे चालवण्यासाठी सुरु केलेल्या अभियानाला गेल्यावर्षी सुरवात झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे मुलांच्यात 40% प्रगती आढळून आली. यंदाच्या वर्षी देखील अडीच लाख माता पालक गट आणि १४ लाखांहून अधिक मुलांचा सहभाग या अभियानात नोंदवला जात आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात नर्सरी, ज्युनियर, सिनियर के. जी. यांचा समावेश केला आहे. यामध्ये मुलांची काळजी घेण्याबरोबरच मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षर, अंक याची ओळख, व्यक्तिमत्व विकास याची माहिती व्हावी. म्हणजे प्रवेश करतानाच मुले सक्षमपणे अभ्यास करू शकतील. म्हणूनच यंदाही मातांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान द्यावं.
याबरोबरच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी व नागरिक यांनीही ‘पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी’ या अभियानात आवर्जून आपला सहभाग नोंदवावा. यातून महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं पुढची पिढी आपणच सक्षम बनवूया, असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.
Leave a Reply