
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व निमित्त दिनांक 6 ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल मध्ये लोकोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या विचार व कार्याला उजाळा देण्यासाठी आयोजित कृतज्ञता पर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिलमध्ये होणाऱ्या सर्व उपक्रमांत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतर्गत विभाग, महिला बचतगट, विविध संस्था, संघटना, तरुण मंडळे, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी सहकुटुंब सहभागी होवून इतरांनाही यासाठी प्रेरित करावे.समाजातील सर्व घटकांसाठी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य महत्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. या दिवशी कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमा दरम्यान वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी नियोजन करा, तसेच पोलीस बंदोबस्त द्यावा, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यावेळी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.ग्रामीण उद्योजकांना शहराला जोडण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने शाहू मिलमध्ये दिनांक 6 ते 14 मे दरम्यान विविध उपक्रमांबरोबरच कृषी, उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रांशी संबंधित जिल्ह्यातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. तसेच गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तु, घोंगडी, जान, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादने आणि आंबा महोत्सव आयोजित केला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणारे, कोल्हापूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांचा विकास दर्शविणारे व विविध शासकीय योजनांची माहिती देणारी दालने याठिकाणी असणार आहेत, सर्व स्टॉलवर दर्जेदार उत्पादने ठेवण्याचे नियोजन करा, असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी दुपारच्या सत्रात माहितीपर मराठी व हिंदी चित्रपट तसेच दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. सर्व दालनांना, स्टॉल्सला व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅलिग्राफी, पेपरक्राफ्ट, माती शिल्प, चित्ररेखांकन व रंगकाम, ॲनिमेशन आदी बाबत माहितीपर कार्यशाळा दररोज सकाळच्या सत्रात येथे घेण्यात येणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.शाहू मिल परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मिलच्या मागील भागाचाही पार्कींगसाठी वापर करा. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा. विद्युत पुरवठा अखंडीत सुरु राहील, याची दक्षता घ्या. वैद्यकीय टीम तैनात ठेवा, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, घन कचरा संकलनाची सोय करा. सर्व तयारी 5 तारखेला पूर्ण होईल, याची दक्षता घ्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून आदरांजली अर्पण करावयाची आहे. या उपक्रमासह शाहू मिल येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्येही सर्वजण सहभागी होवूया.
Leave a Reply