
कोल्हापूर: केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून पीएम ई बस सेवा प्रकल्प सुरू झाला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी या प्रकल्पातून कोल्हापूर महापालिकेला ई बसेस मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. संपूर्ण देशात ३ हजार १६२ तर महाराष्ट्रासाठी १ हजार २९० ई बसेस मंजुर झाल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार राज्यातील निवडक शहरांमध्ये ई बसेसची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शहराची गरज लक्षात घेवून खासदार धनंजय महाडिक यांनी, कोल्हापूर शहरासाठी १०० ई बसेस केंद्र सरकारकडून मंजुर करून घेतल्या आहेत. ३० ऑक्टोबर २०२३ ला या संदर्भातील ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, राज्य सरकारचे अधिकारी आणि दिल्लीतून केंद्र सरकारचे अधिकारी सहभागी झाले होते. खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा आणि आग्रह, तसेच कोल्हापूर महापालिकेला ई बसेसची गरज लक्षात घेवून, आज तातडीने १०० ई बसेस मंजुर झाल्या आहेत. त्याचा आदेशही केंद्रीय मंत्रालयाने जारी केला आहे. त्यामुळे लवकरच के एम टी च्या ताफ्यामध्ये वातानुकुलित १०० ई बसेस सामील होणार आहेत. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करतानाच, पर्यावरण संतुलनासाठी किंवा प्रदुषण टाळण्यासाठी, या ई बसेस अत्यंत महत्वाची भुमिका बजावणार आहेत.कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागात म्हणजेच के एम टी च्या ताफ्यात कधीकाळी १२९ बस होत्या. त्यातील ४१ बस मुदतबाह्य झाल्या किंवा स्क्रॅप झाल्या. सध्या के एम टी कडे ९९ बसेस असून, त्यापैकी ७० बसेस रस्त्यावर धावत आहेत. २०१५ साली जवाहरलाल नेेहरू नागरी पुनरूत्थान योजनेतून केएमटीला ७५ बस मिळाल्या होत्या. मात्र त्यापैकी अनेक बसेस आता नादुरूस्त बनल्या आहेत. एक लाख लोकसंख्येमागे ४० बसेस सार्वजनिक वाहतुकीसाठी असाव्यात, असा शासकीय नियम किंवा संकेत आहे. त्यानुसार के एम टी कडे किमान १६० बसेस असणे आवश्यक आहे. मात्र त्याचा दैनंदिन आणि देखभाल दुरूस्ती खर्च के एम टी ला परवडणारा नाही. मुळात कोल्हापूर महापालिकेचा परिवहन विभाग नेहमीच आर्थिक संकटात असतो. इथल्या कर्मचार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तर नव्या बस खरेदी करणे, के एम टी प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे. सध्या के एम टी कडून कोल्हापूर शहराच्या २० किलोमीटर पर्यंतच्या भागात प्रवासी वाहतुक सेवा पुरवली जाते. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी कोणत्याही शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने खासदार धनंजय महाडिक यांनी, सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न करून, कोल्हापूर शहरासाठी एकाच वेळी १०० वातानुकुलित ई बसेस मंजुर करून आणल्या आहेत. शहराच्या विकासाचा हा एक मोठा टप्पा असून, या बसेसची १० वर्षासाठीची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी, के एम टी प्रशासनाकडे असणार नाही. त्यामुळे केएमटी ला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
Leave a Reply