परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी ४० हजार, म्हैस खरेदी अनुदानात १० हजार रूपये वाढ :अरुण डोंगळे

 

कोल्हापूर: गोकुळ मार्फत दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रमुख्याने जातिवंत म्हैस खरेदी योजना, जातिवंत वासरू संगोपन योजना, वैरण विकास, मुक्त गोठा यासह इतर योजनांचा समावेश आहे. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन व संघाच्या दूध संकलन वाढीस चालना देण्यासाठी परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदानामध्ये रुपये १० हजार इतकी वाढ करून नवीन अनुदान रुपये ४० हजार इतके करण्यात आले आहे. यासोबतच वासरू संगोपन योजना, वैरण विकास, मुक्त गोठा या योजनांच्या अनुदानात ही वाढ करण्यात आली असून या सुधारित योजनाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना आर्थिक हातभार लागणार असून परिणामी दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाने २० लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. खास करून म्हैसीचे दूध संकलन संघ कार्यक्षेत्रामध्ये वाढावे यासाठी संघाच्यावतीने कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये वैरण विकास कार्यक्रम, जातिवंत म्हैस खरेदी, जातिवंत मादी वासरू संगोपन, कृत्रिम रेतन कार्यक्रम यावर भर देण्यात आला आहे.गोकुळ दूध संघ हा म्हैस दुधासाठी प्रसिद्ध असून मुंबई, पुणे, कोकण तसेच इतर शहरामध्ये गोकुळच्या म्हैस दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळने परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना चालू केली असून या योजनेला आणखी बळ देण्यासाठी दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन पर अनुदानात वाढ करण्यात आली आहे. परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी व वासरू संगोपन योजनेअंतर्गत जातिवंत म्हैसी करिता योग्य पशुआहार मिळावा, त्यांच्याकडून अपेक्षित गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन व्हावे, योग्य वेळेत जनावरे गाभण जाऊन त्यांचा भाकड काळ कमी व्हावा तसेच गोठ्यात तयार झालेल्या पाड्या व रेड्यांना संतुलित आहार मिळावा या उद्देशाने देय अनुदानातील काही रक्कम पशुआहाराच्या स्वरूपात देण्यात येणार आहे व उर्वरित रक्कम संस्थेच्या दूध बिलातून रोख स्वरूपात देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!