खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हयातील खेळाडूंबरोबरच  क्रीडा क्षेत्रालाही चालना: खा.धनंजय महाडिक

 

कोल्हापूर: देशात दर्जेदार खेळाडू घडावेत अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या क्रीडा कुंभमेळयातून भविष्यात राष्ट्राला दर्जेदार खेळाडू मिळतील. या क्रीडा स्पर्धेमुळे कोल्हापूर जिल्हयाच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खासदार क्रीडा महोत्सवाला शिवाजी विद्यापीठात सुरवात झाली.  त्याप्रसंगी ते बोलत होते. चॅम्पियन ऑफ कोल्हापूर ही संकल्पना कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरेल, असा विश्‍वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतुने खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून खासदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी पर्यंत चालणार्‍या या क्रीडा कुंभ मेळ्याचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात पार पडले. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर सभागृहात खासदार धनंजय महाडिक, खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक,  पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, रोटरीचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम, भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाची सुरवात झाली. खेळाडूंतर्फे महाडिक कुटुंबियांना शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकाराचं सरस सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!