
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या बांधकाम विषयक मंजुरी तसेच सर्व परवानग्या जलद व सुलभ करण्याचा प्रयत्न करु तसेच ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने देखील ही प्रक्रिया राबवणार असल्याचे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. नगररचना विभागात १८२ पदांची भरती केली जाणार आहे. अर्थव्यवस्थेत क्रीडाई चे योगदान मोठे आहे. यामुळे रोजगार निर्मिती होत आहे. तसेच विभागातील कामे अधिक गतीने होतील. टीडीआर ले आऊट संदर्भातील बाबी अधिक सुलभ करण्यावर भर राहील. असेही त्या म्हणाल्या.कोल्हापूर क्रीडाईतर्फे ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान महासैनिक दरबार हॉल मैदानावर बांधकामविषयक भव्य दालन – २०२४ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन के. मंजूलक्ष्मी व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते रेसिडेन्सी क्लब येथे झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे, विनय झगडे, किरण माने, भूमापनचे शशिकांत पाटील यांना प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष के.पी. खोत यांनी स्वागत केले. तर दालनचे चेअरमन चेतन वसा यांनी प्रास्ताविक केले.
साडेतीन एकर परिसरात होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये एकूण १६८ स्टॉल असून १०० पेक्षा जास्त स्टॉल सभासदांसाठी, तर ६८ स्टॉल बांधकाम व्यावसायिक, साहित्य व वित्त पुरवठादारांसाठी आहेत. यंदा प्रदर्शनाची ‘क्राफ्टिंग होम्स शेपिंग टुमारो’ ही संकल्पना असून दर तीन वर्षांनी होणारे प्रदर्शन सभासदांच्या मागणीमुळे दोन वर्षांनीच घेत असल्याचे चेतन वसा यांनी सांगितले.
पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले, या दालन प्रदर्शनाच्या नियोजनासाठी पोलिस विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य करू. यावेळी अध्यक्ष खोत यांनी नगररचना विभागाकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानग्या जलद गतीने मिळाव्यात, अशी मागणी केली. सचिव संदीप मिरजकर यांनी आभार मानले. उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, खजानिस अजय डोईजड, दालनचे उपाध्यक्ष प्रमोद साळुंखे, अतुल पोवार, गणेश सावंत, संग्राम दळवी, श्रीधर कुलकर्णी, उदय निचिते उपस्थित होते.
Leave a Reply