
सोलापूर: भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या उंच्या पुऱ्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश वर विजय मिळविला. या दोन्ही मल्लांनी, कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फेडलं. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी भरविलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जवळपास १००० मल्लांनी हजेरी लावली होती.खा.धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून, भीमा सहकारी साखर कारखानाच्या वतीने ‘खासदार महोत्सव’ अंतर्गत, चेअरमन विश्वराज महाडिक यांनी रविवारी भीमा केसरी कुस्त्यांचे जंगी आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर खा. धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे, चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप, आ.यशवंत माने, ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजीत पाटील, प्रा.शिवाजीराव काळुंखे, मातोश्री मंगलताई महाडिक, ‘भागीरथी’च्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, सरपंच विश्वास महाडिक, पवन महाडिक, विजय महाडिक, भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, मानाजी माने, जिल्हा दूध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, शंकरराव वाघमारे, अंकुश आवताडे, पै.सुनील पाटील, सरपंच दीपक पुजारी, विशाल पवार कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते.
टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर कुस्तीचा भव्य आखाडा बनविण्यात आला होता. पै. भीमरावदादा महाडिक, पै.विष्णुपंत भाऊ महाडिक, पै.वनश्री नाना महाडिक, पै.आ.भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करून, कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या कुस्त्यांमध्ये भीमा केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख व पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर यांच्यात लढत झाली. १८ ते २० मिनीटे सुरू असलेली कुस्ती चांगलीच रंगली. डाव प्रतिडाव टाकत दोघेही मल्ल आकमक खेळ करत होते.त्यावेळी मैदानावरील प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता. अखेर सिकंदरने प्रदीपसिंगला एकचाक डावावर अस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली.याशिवाय भीमा कामगार केसरी – पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल भुंदू यांच्यात झाली. दोघेही चपळ असल्याने वेगवेगळे डाव टाकत विजयासाठी प्रयत्न करत होते. अखेर गुणांवर कुस्ती निकाली निघाली . त्यात पृथ्वीराज पाटील विजयी झाला. भीमा सभासद केसरी किताब साठी, माऊली कोकाटे विरुध्द गुरजीत मारगोड यांच्यात लढत झाली. त्यातही माऊली कोकाटे गुणांवर विजयी झाला. भीमा साखर केसरी कीताबांसाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध दिनेश गोलिया अशी लढती झाली. यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी, सिंगल नेल्सन डावावर दिनेशला आसमान दाखवले.
Leave a Reply