
कोल्हापूर : गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई ( GMBF) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर सयुंक्त विद्यमाने महाबीझ २०२४ ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होत आहे. या परिषदेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय बिझनेस समिटसाठी प्रमुख पाहुणे आहेत. उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी महाबिझ २०२४ ही एक सुवर्णसंधी असल्याची माहिती GMBF दुबईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी संयुक्तपणे दिली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले, व्यावसायिक राजीव लिंग्रज, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निर्यात समितीचे चेअरमन रमाकांत मालू यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली.
अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर आणि महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी संयुक्तपणे माहिती देताना म्हणाले, नेटवर्क तयार करणे, ज्ञानाची देवाण घेवाण, व्यवसायाच्या संधीचा शोध घेणे. त्यासह अर्थपूर्ण भागीदारीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी दुबई येथे येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला महाबिझ-२०२४ समिटचे आयोजन केले आहे. प्रतिष्ठित द अटलांटिस द पाम येथे हे समिट होत आहे.
ते पुढे म्हणाले, निर्यात वृद्धी, नेटवर्किग आणि ज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी तसेच व्यावसायिक संबध दृढ करण्यासाठी महाबिझ होत आहे. गेल्या दोन दशकांपासून सक्रिय असलेल्या गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने (जीएमबीएफ) आयोजित केलेल्या वार्षिक सातव्या समिटमध्ये जगभरातून ९०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये सुमारे ७५० कोटी रुपयांच्या व्यवसायाची नोंद होण्याची अपेक्षा आहे. महाबिझ-२०२४ साठी विविध क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आमंत्रित करण्यासाठी जीएमबीएफने देशातील विविध शहरात रोड शो आयोजित केला आहे. आगामी जीएमबीएफ ग्लोबल कॅम्पेन ड्राइव्हसाठी विशेष आमंत्रण देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
निर्यात वृद्धी नेटवर्किग आणि ज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी तसेच व्यावसायिक संबध दृढ करण्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. यापूर्वी महाबिझ २०२२ मध्ये सुमारे २५० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. तर महाबिझ २०२४ मधून संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि भारतात ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. आफ्रिकेशी व्यावसायिक दृष्टया कनेक्टमुळे विविध आफ्रिकन देशांचा सहभागांमुळे दरम्यान ७५० कोटी रुपये व्यवसायाची अपेक्षा आहे.
Leave a Reply