राम मंदिर लोकार्पणनिमित्ताने कोल्हापुरात भरगच्च कार्यक्रम

 

कोल्हापूर: समस्त हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची अत्यंत गतीने बांधणी झाली आणि आता २२ जानेवारी २०२४ या मंगल दिनी, या मंदिरात राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. समस्त भारत वर्षासाठी आणि सकल हिंदू समाजासाठी हा आनंदाचा, अभिमानाचा, शौर्याचा आणि संस्कृतीचा दिवस आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मभूमीसाठी हिंदू समाजाने गेली अनेक दशके राजकीय- सामाजिक- वैचारिक आणि न्यायालयीन लढाई लढली. श्रीराम जन्मभूमीसाठी हिंदू समाजातील अनेकांनी बलिदान दिले. अयोध्येत कारसेवा केली. आणि त्यानंतर पौष शके १९४५, म्हणजेच सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी, हिंदुस्थानच्या पवित्र- पौराणिकं आणि पुण्यभूमी असलेल्या अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्र पुनर्स्थापित होत आहेत. समस्त हिंदुस्थान मधील प्रत्येक नागरिकासाठीहा आनंदाचा, कृतार्थतेचा आणि शकता. यानिमित्ताने न भूतो- ना भविष्यती, अशी सुवर्णसंधी आपल्याला लाभत आहे. कोल्हापुरातील सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे, दिनांक २१ आणि २२ जानेवारी यादिवशी आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे. आपले दैवत प्रभू श्री रामचंद्र यांची अयोध्या नगरीत प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळा या निमित्ताने कोल्हापुरात विविध धार्मिक- सांस्कृतिक आणि हिंदू समाज एकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता बिंदू चौक येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. त्यामध्ये पारंपारिक वाद्यांसह श्रीरामांचा जयजयकार करणाऱ्या गीतांचा समावेश असेल. कोल्हापुरातील समस्त हिंदूनिष्ठ बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी होण्याचा निश्चय केला आहे. तर २२ जानेवारी कोल्हापुरातील दसरा चौक मैदानात, श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती दर्शनासाठी उपलब्ध असेल.त्यातून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे कोल्हापुरातही दर्शन घेता येईल. शिवाय भगवान श्रीरामांची १०८ फूट उंचीची भव्य दिव्य प्रतिमा दसरा चौकात उभारण्यात येईल. रामलल्लाच्या या दिव्य आणि विशाल मूर्तीवर,अक्षता आणि पुष्प अर्पण करण्याची सर्वांना संधी मिळणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता कीर्तन,महाआरती आणि प्रसाद वितरण होणार आहे. तर सायंकाळी साडेसहा वाजता कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे नामवंत गायक आणि कलाकारांकडून गीत रामायणाचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमातून प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण जीवनपटाचे भक्तीमय सादरीकरण होईल. अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण – भक्ती पूर्ण अशा गीतरामायण कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय दिनांक २२जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांसह आतषबाजी केली जाणार आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरात ३० ठिकाणी प्रभू रामचंद्र यांचे भव्य कट आउट उभारले जातील. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला राम लल्लांचे सहज दर्शन होऊ शकेल. अशी माहिती खासदार धनंजय महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्या वतीने, थेट प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहातून अभिमंत्रित केलेल्या अक्षता आणि निमंत्रण पत्रिका प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सुनियोजितरित्या संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी हजारो रामभक्त आणि हिंदूनिष्ठ कार्यकर्ते भक्तिभावाने राबत आहेत. या अक्षताकोणीही घराजवळील मंदिरात किंवा प्रतिकात्मक मंदिरात अर्पण करू शकतात. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर लोक लोकार्पण सोहळ्यात सर्वांनी मनापासून, हृदयापासून सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!