
कोल्हापूर:देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस)मोठा वाटा आहे. सैनिक गिरगावमध्ये आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा व संस्कार अधिक समृद्ध होतील असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांनी व्यक्त केला.कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्यावतीने दिनांक १५ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत सैनिक गिरगावमध्ये ७ दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चौगले बोलत होते. यावेळी सरपंच महादेव मल्लू कांबळे, उपसरपंच उत्तम विष्णू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरामध्ये सैनिक गिरगाव स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, नव मतदार जनजागृती, आरोग्य शिबीर, डेंग्यू व मलेरिया बाबतीत जनजागृती व सर्व्हे, पाणी तपासणी इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. याचबरोबर दररोज सायंकाळी गावातील लोकांसाठी जनजागृती व प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाले. विद्यार्थ्यानी समाजाशी नेहमी कनेक्ट रहावे. आपल्या हातून सेवा कार्य घडावे असा प्रयत्न विद्यार्थ्यानी नेहमी करावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.समारोप समारंभात बोलताना डॉ. चौगले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना, त्याचे उद्देश व महत्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यानी नेहमी समाजात वावरले पाहिजे, तरच त्यानी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होईल. या शिबिराच्या माध्यमातून मानसिक, भावनिक, सामजिक व सांस्कृतिकदृष्ट्या विद्यार्थी समृद्ध बनतील. मनाची स्वच्छता होऊन वर्तूणुकितही पारदर्शकता येईल असे त्यानी सांगितले.सरपंच महादेव कांबळे म्हणाले, आपण समाजाचे देणे लागतो ही भावना नेहमी ठेवावी. महात्मा गांधी यांच्या तत्वावर चालण्याची शिकवण या शिबिराच्या व एनएसएसच्या माध्यमातून मिळेल.यावेळी गिरगावचे उपसरपंच उत्तम पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आनंदराव पाटील, जालिंदर पाटील, डॉ. गणेश पाटील, महाविद्यालयाचे रजिष्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डीन स्टुडंट अफेअर्स डॉ. राहुल पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चौगुले यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
Leave a Reply