
कोल्हापूर : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय विद्यार्थी दशेतच मोठं ध्येय बाळगा. ध्येयपूर्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवा. अवांतर वाचनाची गोडी निर्माण करा. मोबाईलचे व्यसन टाळा. गुगल, सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी करा, आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून खडतर परिश्रम केल्यास हमखास यश प्राप्ती होत असल्याचा कानमंत्र विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी दिला.जागतिक महिला दिनानिमित्त शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे, मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, राज्य कर विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीद , माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुण्याच्या पोलीस उपनिरीक्षक (सीआयडी) दीपाली अतकरे – पाटील, चिपळूणच्या एएचए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या तथा आकार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी कार्वेकर – ओतारी, मीरा डे केअरच्या संचालिका चित्रा भोई – सुपेकर, फॅशन डिझायनर विशाखा वसंत चिले आदी मान्यवर उपस्थित होते.
.
मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून परिसंवाद आयोजित करण्यामागील हेतू विशद केला. विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेतून शिकून गेलेल्या आणि सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करत असलेल्या विद्यार्थिनींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, या विचारांनी महिला दिनानिमित्त हा परिसंवाद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.सचिव एम. एस. पाटोळे यांनी महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थिनींच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन शितल कपिलेश्वरी आणि सोनाली महाजन यांनी केले. निर्मला शेळके यांनी आभार मानले.कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Leave a Reply