
कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप. सोसायटीच्या टोप संभापूर औद्योगिक वसाहतमध्ये उद्योग उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. येथून सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष व आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.टोप संभापूर औद्योगिक वसाहतमध्ये उभारण्यात येणाऱ्या 33/11 KV वीज सबस्टेशनचे भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, लघु उद्योजक सभासदांना औद्योगिक कारणासाठी जागा पुरविणे, लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन देणे हा उद्योग सोसायटीचा मुख्य हेतू आहे. यानुसारच टोप संभापूर येथे सोसायटीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. येथील विजेचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वीज वितरण कंपनीने औद्योगिक वसाहतीमध्ये सबस्टेशन उभारणीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या कामाचा आज शुभारंभ होत आहे. काम वेळेत पूर्ण करून वीजपुरवठा उद्योगांना लवकर सुरू व्हावा अशा सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये लवकर उद्योग सुरू व्हावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत. ही औद्योगिक वसाहत कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरणार असून, या भागातून सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजन सातपुते, संचालक दिनेश बुधले , चंद्रकांत चोरगे, हिंदुराव कामते, संजय अंगडी, अशोकराव जाधव, भरत जाधव, सुधाकर सुतार, संगीता नलावडे, तसेच महावितरणचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर वडगाव श्री जगताप साहेब, स्वप्निल दळवी तसेच कॉन्ट्रॅक्टर एसटी इलेक्ट्रिकल्सचे प्रोजेक्ट मॅनेजर मारुती तलवार आदी उपस्थित होते.
Leave a Reply