
कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडताना फारसे दिसले नाहीत, अशी टीका अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी केली. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेधे यांचे नाव आजही अभिमानाने घेतले जाते, पण स्वाभिमानाशी बेईमानी करणाऱ्यांना, तत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान दिले जात नाही.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ सभेत डॉ. अमोल कोल्हे कोल्हापुरात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अजित खराडे होते. स्वाभिमानाचा, समतेचा विचार देणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात तत्त्व,निष्ठा, मूल्य नाही. या गोष्टी बाजारात विकत घेऊ शकतो हेच अलिकडील राजकारणाने दाखवून दिले आहे. प्रधानमंत्र्यांच्या दबावानंतर ही सगळी मूल्ये पन्नास खोक्यांना विकली जाऊ लागली आहेत. म्हणूच लाचार होऊन सरपटत जाणाऱ्या गर्दीत सहभागी व्हायचे की ताठ मानेने स्वाभिमानी
फौजेबरोबर जायचे हे दोनच मार्ग आपल्यासमोर आहेत, असे डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.
प्रचार सभेतून आजकाल वैयक्तिक टीका केली जाऊ लागली आहे. जेव्हा वैयक्तिक टीका केली जाते तेव्हा समजायचे की समोरच्यांचा आत्मविश्वास ढळला आहे, असे सांगून कोल्हे म्हणाले की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली, महाराष्ट्रातील अनेक उद्योग बाहेर गेले. महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला गेला. परंतु महायुतीच्या राज्यातील ३९ खासदारांपैकी एकानेही लोकसभेत आवाज उठवला नाही. यावेळी शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, विक्रम जरग, चंद्रकांत यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, दत्ता टिपुगडे, लालासो गायकवाड, संजय पवार यांची भाषणे झाली.
Leave a Reply