श्री अंबाबाई देवीसाठी ४५ तोळे सोन्याची प्रभावळ अर्पण

 

कोल्हापूर:शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या, करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. ४५ तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले असून, त्याची किंमत ३५ लाख रूपये इतकी आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवापासून, ही प्रभावळ वापरात येणार आहे.श्री अंबाबाई देवीवरील श्रध्देपोटी भाविकांकडून, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे. त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता. आज हा संकल्प पूर्ण झाला. ८० वर्षापूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर, ट्रस्टच्यावतीने सोन्याचा मुलामा देण्यात आला. त्यासाठी २४ कॅरेटचे ४५० ग्रॅम म्हणजेच ४५ तोळे सोने वापरण्यात आले. चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी गणेश चव्हाण आणि कारागिरांनी पूर्ण केली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते आणि महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही सुवर्ण प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. देवस्थान समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला. नवरात्रोत्सवात देवीसाठी ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले, अशी प्रतिक्रिया सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, वसंत पंदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे. त्यांचाही सत्कार सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. श्री अंबाबाई देवीसाठी सुवर्ण पालखी ट्रस्टच्यावतीने काम करण्याची संधी मिळणे हेच भाग्याचे आहे, असे सांगून, भरत ओसवाल यांनी सुवर्ण प्रभावळबद्दल माहिती दिली. गुरूवारपासून सुरू होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवात सोन्याचा मुलामा दिलेली ही प्रभावळ वापरण्यात येईल, असे शिवराज नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. या सुवर्ण प्रभावळीमुळे देवीचे रूप आता अधिक विलोभनिय होणार आहे. यावेळी महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव, महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!