
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे.” गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून “दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गोकुळमार्फत म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपये इतकी उच्चांकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांंच्या बँकेतील खात्यावर दि. ११ ऑक्टोबर पर्यंत जमा करण्यात येणार असून हि गोकुळच्या लाखो दूध उत्पादकांना दिलेली दिवाळी भेट आहे.” अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा १८ लाख ४२ हजार लिटरचा टप्पा ओलाडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्या २२ लाख ३१ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ५८ रुपये ५४ पैसे तर गाय दूध उत्पादकास ३८ रुपये ३७ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळाला आहे. संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हैस दूध उत्पादनांत वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना सुरू असून या योजनेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी होऊन जातिवंत म्हैशी खरेदी करून संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण ढवळे यांनी केले.
Leave a Reply