इंडस्ट्री ४.० कार्यक्रम राबवणार, ग्रोक लर्निंग कंपनी आणि सिबिक बिझनेस इन्क्युबेटरचा उपक्रम

 

कोल्हापूर : जिल्हयातील उच्च तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये आयडीया लॅब अटल टिकरिंग लॅब सारखे विविध संशोधनपर विभाग कार्यरत आहेत. या लॅबमधून उद्योग- व्यवसायातील विविध समस्यांबाबत उपाय योजना शोधल्या जातात. मात्र हे उपाय उद्योजक – व्यापार्‍यांपर्यंत पोचत नाहीत. त्यासाठी कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि मुंबईच्या ग्रोक लर्निंग प्रा. लिमिटेड यांच्यावतीनं दोन्ही क्षेत्रामध्ये समन्वय ठेवून, कोल्हापूर जिल्हयातील व्यापार-उद्योग प्रगत आणि स्मार्ट बनवला जाणार आहे, अशी माहिती ग्रोक लर्निंग प्रा. लिमिटेड कंपनीचे सीईओ नितीन कोमावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर जिल्हयातील उच्च तांत्रिक प्रशिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थी आणि संशोधकांकडून व्यापार- उद्योगातील विविध समस्यांवर प्रभावी उपाय योजना शोधल्या जात आहेत. मात्र या उपाय योजना शैक्षणिक स्तरावरच मर्यादित राहतात. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार्‍या उद्योजक- व्यावसायिकांपर्यंत या उपाय योजना पोचत नाहीत. ही दरी कमी करण्यासाठी मुंबईच्या ग्रोक लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड आणि कोल्हापूरच्या सिबीक बिझनेस इन्क्युबेटरच्या वतीनं इंडस्ट्री ४.० डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय. त्याचा शुभारंभ देशाचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीनं करण्यात आला. या दोन्ही संस्थांद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील आयओटी , एआय, रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्किलिंग आणि इनोव्हेशन हा क्लाऊड बेस्ड प्लॅटफॉर्म सुरू झालाय. त्यासाठी कोल्हापुरातील शासकीय पॉलिटेक्नीक मध्ये आयओटी सेन्टर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आलंय. या सेंटर मधून प्रशिक्षणाद्वारे स्किल बेस विद्यार्थी घडवले जाणार आहेत. तसंच कोल्हापूर जिल्हयातील सर्व उद्योग- व्यावसायिकांना सहभागी करून, त्यांच्या कर्मचार्‍यांनाही राेबोटिक्स, एआय यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, असं नितीन कोमावार यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला मोहन भट , मकरंद जोशी , प्रतीक म्हात्रे , उद्योजक पारस ओसवाल, सिबीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दोडमिसे ,संचालक प्रतिक ओसवाल आणि सुनंदा दोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!