गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ; फरकापोटी १३६ कोटी ०३ लाख रक्कम जमा होणार

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) कडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्याकाळात देण्याची परंपरा आहे. गोकुळ तर्फे सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असून “दूध उत्पादक शेतकरी हेच  गोकुळच्या कार्याचे केंद्रबिंदू” या भूमिकेवर ठाम राहून संचालक मंडळ जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच परंपरेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपयाची उच्चांकी रक्कम दि. ०१ ऑक्टोबर २०२५ इ.रोजी थेट प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असून हीच गोकुळ कडून लाखो दूध उत्पादकांना मिळालेली स्नेहपूर्ण दिपावली भेट ठरणार असल्याचे माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये दि.०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. दूध संस्थासाठी प्रतिलिटर सरासरी १ रुपये २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स पोटी  गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना हीरक महोत्सवी जादा दर फरक म्हैस दुधास प्रतिलिटर २० पैसे व गाय दुधास प्रतिलिटर २० पैसे देण्यात आला आहे व तो वरील दर फरकामध्ये समाविष्ठ आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे. गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ६६ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये तर गाय दूधाकरीता ४५ कोटी १४ लाख ८ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ % प्रमाणे होणारे व्याज ५ कोटी ५२ लाख ८९ हजार व डिंबेचर व्याज ७.८०% प्रमाणे १० कोटी ६७ लाख ३५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ८ कोटी ३८ लाख ६९ हजार रूपये असे एकूण १३६ कोटी ०३ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळ संलग्न ८ हजार १२ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १३६ कोटी ०३ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ४२ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॅलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनवरती अनुदान व सेवा-सुविधा वरती खर्च केले आहेत. याबरोबर गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे महालक्ष्मी पशुखाद्य कोहिनूर डायमंड, मिनरल मिक्स्चर (फर्टीमिन प्लस) मोफत व सवलतीच्या दरात, टी.एम.आर.चा पुरवठा, अनुदानावर काफ स्टार्टर, मिल्क रिप्लेसर उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहे.माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी उपस्थित होते.

 

One response to “गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ; फरकापोटी १३६ कोटी ०३ लाख रक्कम जमा होणार”

Leave a Reply to luckywinapk Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!