कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात

 

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजया दशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस बँड वाजविण्यात आला. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. तलाठी प्रल्हाद यादव यांनी शाही घराण्याचे प्रथेप्रमाणे औक्षण केले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने अपूर्व उत्साहात सोने लुटले. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असताना नागरिकांनी त्यांना सोने देण्यासाठी धाव घेतली.
या सोहळयास महापौर माधवी गवंडी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार सतेज पाटील, दै. पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक तथा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, दैनिक सकाळ माध्यम समुहाचे संपादक सल्लागार श्रीराम पवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, माजी खासदार धनंजय महाडिक, डॉ. संजय पाटील आदीसह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर शहरासह अनेक तालुक्यातून आलेले नागरिक स्त्री-पुरुष, लहान मुले यांनी दसरा चौक परिसर गर्दीने फुलून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!