
कोल्हापूर: भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.शाहूपुरी, बागल चौक परिसरात हे संचलन झाले. संघटित सज्जन शक्तीचे दर्शन समाजाला व्हावे यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. या संचलनात स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होतात. कोल्हापुरातही दरवर्षी दसरा संचलन होते. यावर्षी शाहूपुरी आणि बागल चौक परिसरात पथसंचलन झाले. सकाळी सात वाजता शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानात स्वयंसेवक एकत्र आले. शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य नारायण, विभाग संघचालक प्रतापसिंह तथा आप्पासाहेब दड्डीकर, शहर संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. व्ही.टी. पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे आणि ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना होऊन संचलनास सुरुवात झाली. घोषाच्या तालावर स्वयंसेवकांनी संचलन केले. संचलन मार्गावर चौकाचौकांमध्ये नागरिकांनी संचलनाचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावरच संचलनाचा समारोप झाला.
संचलनामध्ये पालकमंत्र चंद्रकांतदादा पाटील पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. तसेच संघ परिवारातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व समाजातील इतर अनेक मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
Leave a Reply