पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर: जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर विषय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिले.जिल्ह्याच्या विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विधान भवन येथे होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कामांची सद्यस्थिती. जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांचा आढावा. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करुन देणे, प्रलंबित अर्ज, वीज जोडणीसाठी प्राप्त अर्ज व वीज जोडणी दिलेल्या अर्जांची संख्या, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे, उद्दिष्ट व साद्य, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, आरोग्य सुविधा व राष्ट्रीय कार्यक्रम, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, महानगरपालिकेचे महत्वाचे प्रश्न या विषयांवर याबैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पूर्ण पडझड झालेल्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करण्याबाबत दोन्ही खासदारांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. अपूर्ण प्रकल्पांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनाबाबत निर्णय घ्यावे. वीजेच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करु. चंदगडमधील पाटणे येथील ट्रॉमा सेंटरच्या जागेचा प्रश्न मार्गी लावला जाईल. शाहू मिल येथे स्मारकाबाबत आराखडा तयार करावा. मुख्यमंत्र्यांसमोर जिल्ह्यातील विकासाचे महत्वाचे प्रश्न निश्चितपणे मांडले जातील असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, अपूर्ण प्रकल्पांबाबत एक एक प्रकल्पाचा विषय घेवून बैठक लावू. ट्रॉमा सेंटरची काय समस्या आहे त्याबाबत सविस्तर अहवाल द्या. त्याचबरोबरच पुरपरिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या आरोग्य केंद्रांच्या इमारती, साधन सामग्री याबाबतचा अहवाल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांना द्यावा. आरोग्य विभागाच्या 35 कोटी निधीसाठी पाठपुरावा करु. शिवभोजन ही मुख्यमंत्र्यांच्या प्राधान्याचा विषय आहे. सर्व सामान्य गरीब जनतेला या योजनेतून फायदा होत आहे. मी स्वत: सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोर थांबून या योजनेचा होणारा फायदा पाहिला आहे. तालुकास्तरावर ही योजना राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करु. शाहू मिल येथील स्मारकाबाबत वित्त मंत्र्यांकडून विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. अंबाबाई तीर्थ क्षेत्र आराखड्याबाबत यावर्षी 25 कोटीच्या निधीसाठी त्याचबरोबरच नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी 178 कोटी निधीसाठी प्रयत्न केला जाईल. लोकप्रतिनिधी मतदार संघ निहाय 5 विषय द्यावेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!