
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 144 कलम लागू केले. पण दूध हे अत्यावश्यक सेवा असल्याने त्यातून वगळण्यात आले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळने 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू असताना लवकर दूध संकलन केले जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. पण 23 मार्च 24 मार्च रोजी गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी समिती करून बाहेरून येणाऱ्या लोकांना गावात येण्यास बंदी केली आहे. गावांच्या सीमा रेषांवर लाकडे ट्रॅक्टर आडवी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे दूध संकलनासाठी कर्मचाऱ्यांना गावात जाता येत नाही.गावात जाण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे दूध उत्पादक दूध घालण्यासाठी बाहेर पडत नाहीत. हीच परिस्थिती गावागावात कायम राहिली तर याचा परिणाम दूध संकलनावर होऊ शकतो. रोज लाखो लिटर दूध संकलन होणाऱ्या दुधाचे संकलन कमी होऊन बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज मुंबईपर्यंत गोकुळ दुधाचा पुरवठा होत आहे. पण दूध संकलन झाले नाही तर दूध पुरवठा ही ठप्प होऊ शकतो. असे दूध संकलन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक डी.डी.पाटील यांनी सांगितले. तरी गावोगावी लोकांनी दूध संकलन करण्यास अडथळा आणला तर दूध संकलन बंद होऊ शकते त्यामुळे दूध उत्पादकांनी सहकार्य करावे असे आवाहनही श्री पाटील यांनी केले आहे.
Leave a Reply