
देवाला रिटायर करा म्हणून गदारोळ उठून डॉक्टर श्रीराम लागू निघून गेले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे दाभोळकर आणि शिवाजी महाराजांचे खरे स्वरूप काय होतं सांगणारे कॉम्रेड पानसरे, धर्माच्या अंधश्रद्धेवर लिहिणाऱ्या गौरी लंकेश आणि बसवेश्वरांचे खरे विचार म्हणणारे डॉक्टर कल्बर्गी या साऱ्यांना धर्मांधतेने संपवले पण त्यांचे विचार संपलेले नाहीत आज कोरोना व्हायरसने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे .तू भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे, साक्षात येशू ख्रिस्त आणि ईश्वराशी संधान बांधणारे, धर्माची शेखी मिरवणारे शंकराचार्य आणि साक्षात अल्लाशी संपर्क साधणारे मुल्ला मौलवी कुठे गेले ?साऱ्यांना कोरोणाने सुट्टी केली .धार्मिक स्थळे ,धर्मगुरू आणि धर्मग्रंथ केवळ महिना दीड महिन्याच्या कालावधीत कोरोणाव्हायरसने मोडीत काढले. अतींद्रिय शक्तीचा दावा करणारे, कुंभमेळ्याला जमणारे हजारो साधुसंत, रामदेव बाबा सारखे अनेक धर्मातले मार्केटिंग मॅनेजर, कोरोणाने त्यांची बोलती बंद केली. तरीपण पालीची शेपटी तुटल्यावर ती काही काळ वळवळत राहते तसे रामदेव बाबा सारखे आणि साध्वी प्रज्ञा सिंग सारखे बरळत राहिले आहेतच पण आज जगण्या-मरण्याचा प्रश्न जेव्हां उपस्थित होतो तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा साऱ्यांनाच आधार घ्यावा लागतो.
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी वटहुकूमाद्वारे मंदिरातील पैशाचा वापर हा माझ्या संस्थानांमध्ये विहिरी खोदण्यासाठी ,शाळा बांधण्यासाठी आणि दवाखान्याची सोय करण्यासाठी केला पाहिजे अशी आज्ञा केली .आज कोल्हापूरच्या जनतेने या वटहुकूमाला स्मरून साऱ्या देशाला नव्या समाज क्रांतीची ,धार्मिक क्रांतीची दिशा देण्याची गरज आहे.
प्रत्येक गावागावातून समाज धारणेसाठी निस्वार्थी सेवा करणाऱ्या दहा तरुणांच्या कडून हे काम होऊ शकते .प्रत्येक गावातील ग्रामदेवतेचे मंदिर त्यात देणगी पेटीत जमा होणारा पैसा आणि धार्मिक कारणासाठी समाजाचा व्यर्थ जाणारा पैसा याचा हिशोब मांडावा त्यातून एका कमिटीने पारदर्शक रित्या जमाखर्च ठेवावा. एका छोट्या गावातून या धर्माकडे वळणाऱ्या पैशाचा वापर आपण भावी पिढीच्या शिक्षणासाठी करू शकतो .त्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणी देऊ शकतो .कुपोषित बालकांना आणि मातांना सकस अन्न देऊ शकतो. आरोग्याच्या चांगल्या सुविधा देता येतात आणि ओढ्या, नाल्यांचे ,विहीरींचे प्रदूषित होणारे पाणी स्वच्छ करता येते .ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य याकडे धर्माच्या नावाने व्यर्थ खर्च होणारा पैसा आपण यापुढे वापरावा आणि ग्रामसभे पासून याचे प्रबोधन करावे अर्थात यामध्ये कोणतीही जात पात आणि राजकारण आडवे आणू नये. प्रत्येक धर्माच्या लोकांनी मंदिर असो मशीद असो चर्च असो याठिकाणी हे परिवर्तन घडवण्याची गरज आहे .ही एक सामाजिक चळवळ जर सुरू झाली तर संपूर्ण भारतामध्ये देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा जास्त पैसा मंदिर ,मशीद, गुरुद्वारा यामध्ये जमा होतो, पुजाऱ्यांच्या कडे जमा होतो.
त्यांना प्रथम समजून सांगा. जर त्यांनी झोपेचे सोंग घेतले तर मात्र त्यांना कठोर उपायाने जागे करावे लागेल. आज कोणताही राजकीय पक्ष या गोष्टी हातात घेणार नाही. आम्हीच आमचे उद्धारकर्ते बनण्याची गरज आहे. जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी वापरला जाणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तोआता यापुढे मिळवायचा. इंग्रजी मध्ये म्हणतात “बाय हूक ओर क्रुक” जर सरळ पणाने हा दडलेला काळापैसा देत नसाल तर सक्तीने ती वर्गणी म्हणून जमा करून समाजासाठी वापरावी लागेल .भारतामध्ये एका पद्मनाभन मंदिरांमधले दाग दागिने जरी लिलाव केले तरी देश कर्ज मुक्त होईल. शिर्डीच्या फकिराने सोन्या नाण्याचा मोह ठेवला नाही .तुमच्या मानवी भावनांचे आरोपण तुम्ही देवतावर करता .कोल्हापूरच्या अंबाबाई ने सोन्याची पालखी मागितली नाही ती तुमची हौस झाली . शीख गुरूनी सोने सुवर्णमंदिर मढवण्यासाठी वापरा म्हणून कुठे सांगितलं नाही. मग हे सारं तुम्ही करता ते कुणासाठी ?ही तुमची हौस असू शकते .आज ही गुंतवणूक तुमचा जीव वाचू शकते. आज कोरोणा व्हायरसचा मुकाबला करायचं झाला तर जिल्हा पातळीवर सुद्धा तुमच्याकडे पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत. ऑक्सीजन सिलेंडर नाही. उपयुक्त लस नाही. वातानुकूलित वाॅरड नाहीत ,पेशंटसाठी बेड तयार नाहीत आणि कशाला लोकांना ताटे वाजवायला सांगता? हा सारा धार्मिक विडंबनाचा प्रकार झाला .हा आपण आता थांबवूया.
प्रत्येक धर्म स्थळाचे विश्वस्तांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि धर्माचा धंदा सोडून समाजहिताचा विचार करावा आणि म्हणून धर्म मुक्त, देव मुक्त, गुरु मुक्त नवे अभियान आपण सुरू करूया .आपला उद्देश स्वच्छ आहे .निस्वार्थी आहे आणि समाजाभिमुख आहे त्यामुळे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. खर्या अर्थाने खरी लोकशाही रुजवण्यासाठी आपण हे करायलाच हवे. हा नवा स्वातंत्र्यलढा आहे. कोणा धर्माविरुद्ध नाही .कोणाच्या श्रद्धे विरुद्ध नाही पण आपल्या अस्तित्वासाठी, भावी पिढीच्या उद्धारासाठी, देशाला बलशाली बनवण्यासाठी ,आम्ही विज्ञानाची कास धरायला हवी .धन्यवाद
डॉक्टर सुभाष देसाई कोल्हापूर ९४२३०३९९२९
Leave a Reply