
कोल्हापूर / प्रतिनिधी:कोरोनामुळे ट्रकचालक व हमालांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गुड्स मार्केटयार्ड रेल्वेधक्का येथे आलेले खते व रेशनधान्य रेल्वेबोगीतून वेळेत उतरून घेण्यास मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत. संचारबंदीमुळे हमाल , ड्रायव्हर, क्लीनर, ऑफिस स्टाफ व इतर कामगार यांना येण्या जाण्यात करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अपुऱ्या कामगारांकडून वेळेत काम करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वेळेत माल उतरून पूर्ण झाला नाही, तर रेल्वेकडून तासाला 7 हजार 500 प्रमाणे 3 ते 5 लाखापर्यंत दंड करण्यात आला आहे. अडचणी समजून न घेता केलेला दंड माफ करावा व कामात सवलती द्याव्यात, तसे नाही केले तर कामबंद आंदोलन करू, असा इशारा जी.आर.एम.टी. कोल्हापूर हँडलिंग अँड ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. रविवारी मार्केट यार्ड येथे आयोजित पत्रकार परिषेदेत असोसिएशनचे पदाधिकारी यांनी हा इशारा दिला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर रेल्वे धक्क्यावर काम करण्यात अधिकच अडचणी वाढणार आहे. माल उतरून ठेवायला शेड नाहीत, हमाल कमी, ट्रक चालक कमी, खते, रेशनच्या मालापेक्षा सिमेंटचा माल अधिक येणे आदींची वास्तव परिस्थीती समजून घेवून रेल्वे प्रशासनाकडून वसूल होणारे वेगवेगळे दंड माफ करावेत. तसेच मालधक्का येथे असलेल्या गैरसोयी व त्रुटी दूर कराव्यात अशीही मागणी असोशिएशनच्या वतीने करण्यात अली आहे.
याबरोबरच रेल्वेधक्का ट्रॅकवरील प्लॅट फॉर्म नंबर तीन व चार वर आलेल्या वॅगनमधील माल खाली उतरून घेता येऊ शकत नाही, कारण खाली उतरून साठवणूक करून ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नाही. ही शेडची व्यवस्था करावी ही गेली दहा वर्षांची मागणी प्रलंबित आहे. ती पूर्ण होणे गरजेची आहे. रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न हे कोल्हापूर रेल्वे धक्का डेपोचा आहे. तरीही मुलभूत सुविधापासून हा डेपो वंचित आहे. या मागण्यांचे निवेदन मेलद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री व रेल्वेप्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.त्यामुळे यावर अवलंबून असणारे सहाशे ट्रक ड्रायव्हर व मालक, क्लिनर, सहाशेहून अधिक हमाल व इतर पुरक कामगार असे किमान पाचहजार जण व त्यांचे कुटुंबिय यांचा विचार करून या मागण्या व त्रुटींची पूर्तता व्हावी अशी, असोशिएशनची मागणी आहे. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे योगेश बंदोटा, निलेश कलशेट्टी, दिनकर पाटील, मोहन कलशेट्टी, महादेव भोसले, विकास जाधव व मोहन झेंडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply