
कोल्हापूर :वास्तविक या पावसाळ्यात आंबेओहोळ आणि नागणवाडी धरणात पाणी अडविणे अपेक्षित होते. परंतु; लॉकडाऊनमुळे तीन महिने काही काम करता आली नाही, हे ठीक आहे . दरम्यान, पावसाळ्यानंतर या दोन्ही प्रकल्पांची पूर्तता यावर्षी झाली नाही, तर यासंबंधी जबाबदार तुम्हा सगळ्याच अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशा लावतो. तुम्हाला कुणालाही पेन्शनसुद्धा मिळू देणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिला . या दोन्ही प्रकल्पाच्या कंत्राटदारांना सुद्धा ब्लॅक लिस्ट करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत संतप्त झालेल्या मंत्री मुश्रीफ यांनी सर्वानाच चांगलेच धारेवर धरले .अधिकाऱ्यांना उद्देशून श्री मुश्रीफ म्हणाले, प्रकल्प सुरू होऊन वर्षे झाली. आंबेओहोळच्या लाभक्षेत्रातील उत्तूर विभागातील २२ व गडहिंग्लज विभागातील आठ गावे अशी एकूण ३० गावे पाण्यावाचून तडफडत आहेत. नागणवाडीच्या लाभक्षेत्रातील चिकोत्रा खोऱ्यातील १८ गावांची हीच अवस्था आहे. उन्हाळा आला की इथली जनता पाण्यासाठी अक्षरशा वणवण फिरते. किमान याची तरी लाज राखा. कालबद्ध आराखडा घेऊन काम करूया. नवीन प्रशासकीय मान्यता आली, त्याचे पैसे आले, ते पैसे तुमच्याकडे वर्गही झाले. सरकारने आणि काय करायचे ? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला. भूमिसंपादन नसल्यामुळे पॅकेज वाटपही झाले नाही. सहाजिकच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कामही झाले नाही. या सगळ्याला महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असतील.आंबेओहोळ प्रकल्पावरील सात व नागणवाडी प्रकल्पावरील दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे ताबडतोब पूर्ण झाले पाहिजेत ,अशा कटाक्षाच्या सूचनाही श्री. मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Leave a Reply