
मुंबई:आतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फिल्म डिव्हिजनच्यावतीने योगबाबत जनजागृती करणाऱ्या लघुपटांचे 21 जून रोजी ऑनलाइन प्रसारण केले जाणार आहे. ‘सेलिब्रिटिज स्पीक’ या उपक्रमाद्वारे योगाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे एकूण 10 लघुपट या माध्यमातून दाखवले जाणार असून यात हिंदी, इंग्रजीसह मराठी, तेलुगु, कन्नडसारख्या इतरही प्रादेशिक भाषांमधील लघुपटांचा समावेश आहे.हे लघुपट 21 जून रोजी संपूर्ण दिवसभर फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यूट्यूब चॅनेलवर चाहत्यांना मोफत पाहता येतील.या लघुपटांमधून सदाबहार गायिका आशा भोसले, सीआयडी फेम शिवाजी साटम, सोनाली कुलकर्णी, क्रिकेटर अनिल कुंबळे, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी, मल्याळम् सिनेमातील नावाजलेले अभिनेते मोहनलाल, ममोत्ती, खासदार आणि अभिनेते सुरेश गोपी यांच्यासह कन्नड सिनेमातील आघाडीचे नायक शिवा राजकुमार यांच्यासारख्या अनेक मान्यवरांचे योग तसेच प्राणायामाबाबतचे विचार ऐकता येतील.
सध्याच्या कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे योगाचे तणावमुक्ती असलेले महत्त्वही अधोरेखित झाले आहे. यंदाचा योग दिवस घरात राहूनच कुटुंबासोबत साजरा करण्याचे आवाहन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासह आयुष मंत्रालयातर्फे ‘माय लाइफ माय योगा’ या व्हिडिओ स्पर्धेचेही आयोजन केले आहे. सोबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फिल्म डिव्हिजननेही 21 जून रोजी प्रमुख लघुपटांचे मोफत प्रसारण करत योग दिवस सादरीकरणात आपला सहभाग नोंदवला आहे.
लघुपट पाहण्यासाठी www.filmsdivision.org या संकेतस्थळावर जाऊन डॉक्युमेंटरी ऑफ द वीक या लिंकवर क्लीक करावे तसेच फिल्म डिव्हिजनच्या यू ट्यूब चॅनेलवरही याचे प्रसारण पाहता येईल.अधिक माहितीसाठी-फिल्म डिव्हिजन,
संपर्क – 9226218200/ 09004035366
publicity@filmsdivision.org
Leave a Reply